पूनम राणे
माणसं जन्माला येतात, पण माणुसकी निर्माण करावी लागते. ही माणुसकी दिसते, सुखदुःखाच्या अनेक विणलेल्या धाग्यांतून; परंतु याच सुखदुःखाच्या धाग्यातून सकारात्मक प्रेरणा घेऊन काही माणसं आपले ध्येय निश्चित करतात. ध्येय निश्चितीसाठी पुरेपूर कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. मग एक दिवस त्यांचाच असतो, आकाशाला गवसणी घालण्याचा… मुलांनो, अशाच एका मुलाची गोष्ट आज सांगणार आहे. “भाजी घ्या भाजी,”… गवार, कोबी, घेवडा, भेंडी, मेथी घ्या…
“अहो ताई, माई, घ्या भाजी घ्या भाजी’’… विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस होता, रस्त्यावर पाण्याचे लोटच्या लोट, अशा वातावरणात डोक्यावर भाजीची टोपली, टोपलीत तराजू, न झेपणाऱ्या ओझ्याची टोपली घेऊन बेंबीच्या देठापासून ओरडणारा हा सात-आठ वर्षांचा चिमुकला. दूध केंद्रावर दुधाच्या बाटल्या घेण्याच्या रांगेत उभे राहून घरोघरी दूध पोहोचविण्याचे काम. त्यातून मिळालेल्या पैशातून तांदूळ, मीठ, मसाला, पीठ, घासलेट आणून संध्याकाळचा स्वयंपाक होत होता. कधीकधी हाच मुलगा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका हातात गोणी घेऊन कचऱ्याच्या ढिगारातील रिकाम्या बाटल्या, लोखंड, भंगार जमा करून भंगारवाल्याच्या दुकानात नेऊन विकत होता. त्याचे त्याला दहा पंधरा रुपये मिळत. ते तो आपल्या आईच्या हातावर नेऊन ठेवत असे. कधीकधी वडापावच्या गाडीवर वडे विकण्याचे कामही करत असे, तर कधी सणासुदीला झेंडूंची तोरणे विकून त्यातून मिळालेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. दिवसभर काम अन् काम…
अशाही अवस्थेत घासलेटच्या दिव्यावर रात्री दोन वाजेपर्यंत आणि पुन्हा सकाळी चार वाजता उठून हा मुलगा अभ्यासाला बसत असे. ऐन दहावीच्या परीक्षेत हा मुलगा आजारी पडला. हिमतीने पाच-सहा किलोमीटरवर असणाऱ्या परीक्षा केंद्रावर चालत जाऊन त्यांने सर्व पेपर दिले आणि शाळेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आईने गळ्यातील एक मनी मंगळसूत्र विकून आणलेल्या पैशातून पेढे आणून वाटले. चाळीतील लोकांनी बक्षीस देऊन त्याचा सत्कार केला. आपला मुलगा शिकला पाहिजे असा विचार त्याच्या पालकांनी केला आणि प्रॉव्हिडंट फंडातून रक्कम काढून त्याने कॉलेजची फी भरण्यासाठी वापरली. कॉलेजमध्ये जाण्यासाठी नवीन कपडे शिवले.
आज पालकांनी खरंच ही गोष्ट अमलात आणायला हवी. आज आपण मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करतो. तसेच त्याच्या लग्नासाठी देखील तेवढाच खर्च करत असतो. गरीब परिस्थितील कुटुंबाने केलेली काटकसर ही आजच्या तरुणपिढीने आणि पालकांनी अंगीकारायला हवी. हा मुलगा पुढे खूप मोठा झाला. महाविद्यालयात गेला. पदवी घेतली आणि आपले शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था काढली. वयाच्या २४ व्या वर्षी पहिली शाळा भांडूपमधील आदिवासी भागात सुरू केली. गोरगरिबांच्या मुलांसाठी आदिवासी पाड्यातील मुलांसाठी शाळा काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते; परंतु या मुलाने सकाळी सात ते रात्री १० असे सतत विविध क्लासमधून क्लासेस घेऊन कधी श्रीमंत मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणी घेऊन पैसे जमा करून त्यातून शिक्षण संस्था आणि शाळा निर्माण केल्या. १७ ते १८ तास हा मुलगा सतत काम करत होता. परिस्थितीची जाणीव असणारा हा मुलगा त्याच्या आयुष्यात विजयी झाला. शाळा, जुनियर कॉलेज, बीएड कॉलेज, डीएड कॉलेज, वसतिगृह, इंग्लिश मीडियम त्यांनी सुरू केले. हा मुलगा आज कित्येक इंटरनॅशनल स्कूलचे सल्लागार म्हणून काम पाहत आहे. कित्येकांना मार्गदर्शन करत आहे. हाच मुलगा महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या नेमलेल्या उपाययोजना समितीवर आज काम करतो आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत शासनाला मार्गदर्शन करत आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेत खानविलकर समिती म्हणून त्यांच्या नावे शिक्षण समिती स्थापन केली. हे प्रचंड मोठे यश आहे.
खचलेल्यांना सावरणारे, दिवाळीच्या दिवसांत आपल्या अंगणातील एक दिवा आदिवासींच्या घरात लावणारे, त्यांच्या अंगावर मायेची शाल पांघरणारे. सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजाराम शेठ महा माध्यमिक विद्यालय, तसेच राजाराम शेठ प्राथमिक विद्यालय, सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, आर. के. डीएड कॉलेज, आर. के. बीएड कॉलेज, आर. के. एम एड कॉलेज, राजाराम शेठ पूर्व प्राथमिक विद्यालय, जुनियर कॉलेज, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे मुला-मुलींचे वसतिगृह, अशा अनेक संस्थांमार्फत संस्थापक म्हणून ते ज्ञानदानाचे कार्य विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. मळलेल्या वाटेवरून सारेच जातात; परंतु स्वाभिमान, सचोटी, नैतिकता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःची पायवाट स्वतः निर्माण करणारा हा मुलगा म्हणजे रमेश खानविलकर. त्यांची ही कथा तुम्हाला जीवन चिंतन करायला नक्कीच भाग पडेल आणि तुमच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल.