जीवनामध्ये यशवंत होण्यासाठी प्रयत्न आणि सातत्य या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात. आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य असल्यास आपले ध्येय सहज पार पाडू शकतो. तेव्हा आपल्या प्रयत्नाला यश मिळाल्यामुळे स्वत:ला शिस्त आणि परिश्रम घेण्याची जिद्द निर्माण होऊन यातून काम करण्याची शक्ती मिळते. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत यश संपादन करण्यासाठी आपल्या प्रयत्नात सातत्य टिकून ठेवायला हवे. त्यासाठी नियमित अभ्यास व आपल्याला समजले नसल्यास शिक्षकांकडून समजून घेऊन प्रयत्न करायला पाहिजे. तसेच प्रयत्नात प्रामाणिकपणे सातत्य असायला हवे म्हणजे यशाच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. याची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यासाठी थोडक्यात घेतलेला वेध
रवींद्र तांबे
आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नात सातत्य असले पाहिजे. यासाठी विशिष्ट कालावधी गृहीत धरावा लागतो. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष असते त्या शैक्षणिक वर्षात एकूण विषय व प्रत्येक दिवशी अभ्यास करण्यासाठी दिला जाणारा वेळ आणि त्यावेळेत त्या विषयाचा केलेला अभ्यास. असा नियमित अभ्यास करायला हवा. केवळ विद्यार्थ्यांनी एक दिवस प्रयत्न करून चालणार नाही तर त्या प्रयत्नात सातत्य असायला हवे. ते सुद्धा दर दिवशी तरच आपण शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश मिळवू शकतो. त्यासाठी प्रत्येक विषयातील संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक आहे. मनाची जिद्द, एकाग्रता व आवड निर्माण करायला हवी. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आळसाने अभ्यास करू नये. कारण आळस हा माणसाचा सर्वात मोठा क्षत्रू आहे. तेव्हा आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश साकारण्यासाठी आळस बाजूला सारून वेळेला महत्त्व द्यावे. जीवनात वेळ महत्त्वाची असते. त्यात दिलेल्या वेळेत सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास उत्तम कामगिरी आपल्या क्षेत्रात करू शकतो. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात यशाचा मार्ग म्हणजे प्रयत्न आणि सातत्य होय. या यशाच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न आणि सातत्य अतिशय महत्त्वाचे असते.
विद्यार्थ्यांनी यश मिळविण्यासाठी अपयशावर मात केली पाहिजे. त्यासाठी अपयश पचविण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. पाहा ना…! मागील आठवड्यात एका कॅन्टीनमध्ये महाविद्यालयातील शिक्षण घेणारी विद्यार्थिनी गेली ती सुद्धा कॅन्टीनच्या किचन रूममध्ये आणि काहीच बोलत नव्हती. काही वेळाने तिने हातात लाईटर घेऊन शेगडी पेटविण्याचा प्रयत्न केला. नंतर ऑईल दे दो… ऑईल दे दो… अशी म्हणायला लागली. हा प्रकार समजता तिला किचन रूममधून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर ती मोठमोठ्याने रडू लागली. नंतर सर्वांच्या लक्षात आले की, ती मुलगी नापास झाल्याने अशा मार्गाचा ती अवलंब करीत होती. तेव्हा संशोधकांनी अशा विषयांवर संशोधन करणे गरजेचे आहे. एखाद्या परीक्षेत सर्वच विद्यार्थी पास होतात असे नाही; परंतु या मुलीला केवळ नापास झाल्याने कॅन्टीनच्या किचनमध्ये जाऊन आता आपण पास होणारच नाही या भीतीने शेवटचे पाहूल उचलत होती. तसेच बोर्डाच्या बारावीच्या पहिल्या पेपरला पुण्यातील एका विद्यार्थ्यांने प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. तेव्हा अशी वेळ विद्यार्थ्यांवर का आली? याचा विचार होणे आवश्यक आहे.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. मात्र प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर नक्कीच आपल्याला यश संपादन करता येईल. तेव्हा कोणतेही यश संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील. जीवनात यशाच्या उंच शिखरावर जायचे असेल तर प्रयत्न अतिशय महत्त्वाचा असतो. त्या प्रयत्नामध्ये सातत्य महत्त्वाचे असते. हे आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. परीक्षा आली की, परीक्षेच्या आदल्या दिवशी मित्राला मोबाईलवरून फोन करायचा. त्यावर पहाटेपर्यंत विषयाच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करायची. मग दुसऱ्या दिवशी तीन तास पेपर कसा लिहिणार? खरंच सांगा एका रात्रीत अभ्यास होईल का? मग परीक्षेच्या काही तास आई-वडिलांना सांगायचे माझे डोके दुखते, अंग थरथरते, मला काहीच अभ्यासाचे सुचत नाही, मी आता परीक्षेला जात नाही? असे अनेक प्रश्न परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर निर्माण होतात. म्हणून अभ्यासक्रम निवडल्यानंतर आणि अभ्यासक्रमाला सुरुवात झाल्यावर नियमित अभ्यास करावा. समजा एखादी मूळ संकल्पना समजली नसेल, तर अध्यापकांकडून इतर वेळेत समजून घ्यावी.
यातच विद्यार्थ्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आपली प्रगती करून घेण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते. यातून यश साध्य झाल्यावर अधिक उत्साह वाढतो. यासाठी आवड असणे जरूरीचे असते. मुळात एखाद्या विषयाची आवडच नसेल तर प्रयत्नात सातत्य कसे निर्माण होणार. हा खरा प्रश्न आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळावे. जर आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळाला नाही तर ज्या क्षेत्रात प्रवेश मिळणार असेल तो समजून घेता आला पाहिजे. त्यासाठी प्रयत्नात सातत्य टिकवता आले पाहिजे. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टींचा योग्यप्रकारे वापर केल्यास आयुष्यात अशक्य असे काहीच नसते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामध्ये सातत्य हवे.