Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटायला लावणारे काम करू- एकनाथ शिंदे

Eknath Shinde : कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटायला लावणारे काम करू- एकनाथ शिंदे

रत्नागिरी : कोकणाचा कॅलिफोर्निया नव्हे, तर कॅलिफोर्नियाला कोकणासारखे व्हावेसे वाटले पाहिजे, असे काम आपल्याला करायचे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. १५ फेब्रुवारी) रत्नागिरीत केले.

मतदारांनी महायुतीच्या नेत्यांना आमदारपदी निवडून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री. शिंदे यांची आभार सभा आज येथील चंपक मैदानात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणातून त्यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयामध्ये कोकणी माणसाचा वाटा मोठा आहे. या विजयाने विरोधकांची बोलती बंद केली. खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण, हे जनतेने ठरवले आहे. जनतेने एवढे बहुमत दिल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आरोपांना आरोपांनी नव्हे, तर कामातून उत्तर देतो. सत्ता येते जाते. पदेसुद्धा वरखाली होत असतात. पण कुठल्याही पदापेक्षा महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या बहिणींनी मला दिलेली ‘महाराष्ट्राचा लाडका भाऊ’ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे, असे भावनिक उद्गार श्री. शिंदे यांनी काढले. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे आश्वासन दिले.

https://prahaar.in/2025/02/15/investigate-the-cost-of-kejriwals-bungalow/

श्री. शिंदे यांनी विकासासाठी सतत कार्यरत राहण्याची ग्वाही दिली, तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीकाही केली. ते म्हणाले, बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले आणि कोकणी माणसाने बाळासाहेबांवर, शिवसेनेवर, धनुष्यबाणावर प्रेम केले. मिळालेला विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलो आहे. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. पूर्ण विचार करूनच योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राला गतिमानतेकडे, विकासाकडे नेण्याचे काम आम्ही केले. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करीन. आमच्या पक्षात सगळे कार्यकर्ते आहेत, कुणी मालक-नोकर नाही. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. आम्ही आरोपांना कामातून उत्तर देणार आहोत. मला शिव्या देण्यापेक्षा लोक तुम्हाला का सोडतायत, याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मी किंवा एकनाथ शिंदे यांनी तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे यांना देश सोडून जावे लागेल.

एकनाथ शिंदेंनी खोके दिले, अशी टीका केली जाते; पण शिंदेंनी खोके दिले ते विकासकामांसाठी दिले आणि त्यांनी सांगितल्यानुसार ४० आमदारांपैकी एकही आमदार पडू दिला नाही. ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा ध्वज फडकेल, असा विश्वास यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेसह सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली.विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या महाविजयाचे खरेखुरे शिल्पकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत आणि हे कुणीच नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान सहसंपर्कप्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडिक, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदींचा समावेश आहे.यावेळी व्यासपीठावर आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे सेनेकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तीन जिल्हा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र महाडीक आणि रोहन बने यांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -