Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai News : सीएसएमटीसह चर्चगेट, मेट्रोजवळील भुयारी मार्ग चकाचक होणार

Mumbai News : सीएसएमटीसह चर्चगेट, मेट्रोजवळील  भुयारी मार्ग चकाचक होणार

पालिकेकडून वार्षिक सहा लाख रुपये खर्च करण्यात येणार


मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), चर्चगेट आणि क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके चौक येथील मेट्रो सिनेमा आदी ठिकाणचे भुयारी मार्ग (सब वे) आता चकाचक केले जाणार आहेत. या भुयारी मार्गाच्या दैनदिन स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नियुक्त करण्यात येत असून यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निविदा मागवण्यात आली आहे. या निविदा प्रक्रियेनंतर सर्व भुयारी मार्गांमधील दैनंदिन स्वच्छतेसाठी खासगी संस्थेच्यावतीने कर्मचारी वर्ग तैनात केला जाणार आहे.



मुंबई शहर भागात मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य रेल्वे स्थानक आणि रेल्वे कार्यालये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस येथील रेल्वे स्थानक याला जोडून असलेल्या भुयारी मार्गातून दररोज हजारो रेल्वे प्रवासी, पादचारी ये -जा करत असतात. या भुयारी मार्गाचा सरकारी आणि खासगी कार्यालयातील नोकरदार वर्ग वापर करत असतात तसेच पर्यटक आणि विदेशी पर्यटक याठिकाणी पाहणी करण्यास येत असल्याने या ठिकाणी कायमच गर्दी दिसून येत असते. सीएसएमटीमधील भुयारी मार्गामध्ये अनेक प्रकारची दुकाने असून त्यासमोरील जागेत अनेक फेरीवाल्यांनी आपले ठेले मांडून यात अतिक्रमण केले आहे.


त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत रेल्वे प्रवाशी तसेच पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. असाच प्रकार चर्चगेट रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात होत असून या दोन्ही भुयारी मार्गातील स्टॉल्सधारक, अनधिकृत फेरीवाले आदींसह पादचाऱ्यांमुळे केली जाणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छतेसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मेटो सिनेमागृहाशेजारील भुयारी मार्गातही दैनंदिन स्वच्छता राखण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने खासगी संस्थेची नेमणूक करण्यासाठी निविदा निमंत्रित करण्यात आली आहे. या तिन्ही भुयारी मार्गाच्या स्वच्छतेसाठी दररोज प्रत्येकी १६०० रुपये खर्च करण्यात येणार असून वार्षिक सहा लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment