कार्यालयात खासगी एजंटचा सुळसुळाट
जामखेड : जामखेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले असून कार्यालयात खाजगी एजंटचा सुळसुळाट असून आर्थिक मलिंदा खाण्यासाठी काही तलाठीही या विभागाचा बेकायदेशीररित्या कारभार हाकलताना दिसत आहे रेशनकार्डासाठी वारंवार इतर कामधंदे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत असून पुरवठा विभागाच्या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.
जामखेड तहसीलदार कार्यालया अंतर्गत पुरवठा शाखा असून या शाखेमार्फत विविध कामे केली जातात. नविन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डात विवाहित महिलांची व लहान मुलांची नावे समाविष्ट करणे, लग्न झालेल्या मुलींची नावे कमी करणे, नावात दुरूस्ती करणे आदी स्वरुपाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात. मात्र या कामासाठी कर्मचारी वेळेत काम करत नसल्याने नागरिकांना यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.
Shani Shingnapur : शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक! शनि शिंगणापूर देवस्थानचा निर्णय
तालुक्यातील नागरिक ग्रामीण भागातून येथे इतर कामे सोडून आपल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारत असून त्यांना या कामासाठी महिनोंमहिने लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.काही कामासाठी पैशांचीही मागणी होते याकडे सफशेल दुर्लक्ष करण्यात येते,काही कामासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना दीड ते दोन महिने लागत असल्याने पुरवठा विभागाच्या कासवगती कामाबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने आथिर्क व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
रेशनकार्ड संदर्भातील विविध कामे करताना मुळ रेशनकार्ड घेतले जाते. त्यामुळे इतर कामासाठी रेशनकार्डची गरज भासल्यास ते मिळत नसल्याने नागरिकांची इतरही कामे खोळंबतात.तसेच कामे करण्यासाठी काही एजंट कार्यालयात बसून असतात तसेच काही तलाठी बेकायदेशीररीत्या पुरवठा विभागाचा कारभार हाकलताना दिसते तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचार्याकडून उर्मट उत्तरे दिली जातात, अशी तक्रार नागरिक करत आहे. दरम्यान, या कार्यालयात कर्मचारी वाढवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुरवठा विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद
येथील पुरवठा विभागाचा कारभार बेशिस्तपणे चालेल असून अनेक वेळा तक्रारी करून फक्त कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडले जाते,त्यामुळे कर्मचाऱ्यांना धाक नसल्याने मनमानी करभार केला जात आहे,पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर विभागातील अधिकारी या विभागात जास्त लक्ष घालताना दिसत आहे.