Friday, May 9, 2025

कोकणमहाराष्ट्रताज्या घडामोडीरायगड

अलिबागच्या शिक्षकाची अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या

अलिबागच्या शिक्षकाची अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या
वाशी : अलिबागमधील कुर्डुस नावाच्या गावात राहणाऱ्या वैभव पिंगळे या ४५ वर्षांच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अर्थात शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी घडली. सेक्सटॉर्शनला वैतागून वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभव पिंगळे हे क्रेटा कारने अटल सेतूवर आले. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर पुलावरुन समुद्रात उडी मारली. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने सेतूवर एक कार थांबली असल्याचे पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस पोहचण्याआधीच वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केली होती.



मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी वैभव पिंगळेंना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले होते. पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराला वैतागलेले वैभव पिंगळे प्रचंड मानसिक ताणाखाली होते. त्यांनी पोलिसांची मदत घेण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे प्राथमिक तपासातून समजले आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. उलवे पोलीस तपास करत आहेत.

याआधी २०२४ मध्ये अटल सेतूवरुन आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. सावध असलेल्या पोलिसांनी उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला ताब्यात घेतले होते.
Comments
Add Comment