Sunday, March 16, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखअभिजात मराठीचा गौरव सोहळा!

अभिजात मराठीचा गौरव सोहळा!

मराठी भाषेचा प्रवास हा केवळ काही शतकांचा नाही, तर तो संस्कृती, इतिहास, साहित्य, विचारधारा आणि चळवळी यांचा जाज्वल्य इतिहास आहे. शिवकालीन युद्धनीती असो, संत वाङ्मयातील अध्यात्म असो, की लोकमान्य टिळक, सावरकर यांच्या लेखणीतील क्रांतीचा हुंकार-मराठीने प्रत्येक युगात आपली छाप सोडली आहे. आजही ही भाषा डिजिटल युगात नव्या वाटा शोधत व्यापक रूप धारण करत आहे.

वर्षा फडके – आंधळे

अभिजाततेचा गौरव मिरवणाऱ्या या भाषेचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा भव्य उत्सव म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन! मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांचे हृदयस्पंदन आहे. यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत होत आहे, आणि या संमेलनाला अनेक कारणांमुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा अभिमानाचा क्षण असेल. संपूर्ण भारतभर आणि जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरेल. संत साहित्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया मराठी भाषेच्या समृद्धीचा पाया संतांनी घातला. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणत ज्ञानेश्वरी रचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठीची महती सांगताना अभिमानाने म्हटले ‘माझ्या मराठीचिया बोलू कवतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!’ संत तुकारामांच्या अभंगांमध्ये समाजमन घडवण्याचे सामर्थ्य होते, तर समर्थ रामदासांच्या लेखणीत राष्ट्रवादाची चेतना होती. या संतवाणीने केवळ धर्मप्रसार केला नाही, तर मराठी मनाच्या विचारसरणीला एक नवा आयाम दिला.

इतिहास, काव्य, कथा आणि क्रांती – मराठी साहित्याचा अविरत प्रवास मराठी साहित्य हे केवळ संतवाणीपुरतेच सीमित राहिले नाही. सुरेश भटांच्या काव्यपरंपरेपासून कीर्तनसंस्कृतीपर्यंत, लोककथांपासून ऐतिहासिक चरित्रांपर्यंत, नाटकांपासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत मराठी साहित्याने विविध अंगांनी समृद्धी मिळवली आहे. लोकमान्य टिळक यांच्या अग्रलेखांनी स्वातंत्र्यलढ्याला धार दिली, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी साहित्याला नवचैतन्य दिले, तर पु. ल. देशपांडे यांनी आपल्या मिश्कील लेखणीतून मराठीला वेगळीच उंची दिली. वि. स. खांडेकर, रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांच्या साहित्याने इतिहास आणि समकालीन समाजजीवनाचे दर्शन घडवले. आज, मराठी साहित्य नवनव्या वाटा शोधत आहे. किंडलवर पोहोचत आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकले जात आहे, आणि सोशल मीडियावर चर्चिला जात आहे ही बाब उल्लेखनीय आहे.

भविष्यातील वाटचाल – मराठी भाषा आणि तिचे जतन मराठी भाषा ही केवळ भूतकाळाचा गौरव नसून, भविष्याची शिदोरी आहे. डिजिटल क्रांतीच्या युगातही मराठी साहित्य नवनवीन प्रयोगांमधून पुढे जात आहे. ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक्स, वेब सिरीज या सर्व माध्यमांतून मराठी भाषा नव्या पिढींपर्यंत पोहोचत आहे. ९८ वे साहित्य संमेलन हे केवळ एक सोहळा नाही, तर मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा आहे. आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, आणि तिच्या वृद्धीसाठी योगदान दिले पाहिजे. चला तर मग, माय मराठीच्या श्रीमंतीचा आणि साहित्याच्या भव्यतेचा हा सोहळा साजरा करूया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -