दरडमुक्त परिसरासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक डोंगरावर वसलेल्या वस्त्यांमध्ये दरड कोसळून दुघर्टना होण्याची भीती वर्तवली जात असतानाच घाटकोपर येथील दोन ठिकाणी जीओ नेटिंग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.
घाटकोपरमधील सोनिया गांधी नगर आणि आझाद नगर आणि टेकडी क्रमांक ४ आदी ठिकाणी या पध्दतीचा वापर करण्यात आला असून या तिन ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अर्थात एमएसआरडीसीच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली आहेत. या तिन्ही ठिकाणच्या दरड मुक्त परिसरासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मुंबई उपनगरामधील संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधणे व इतर आवश्यक उपाययोजना करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. पूर्व व पश्चिम उपनगरातील एकूण २९ ठिकाणे अंतर्भुत असून त्यात घाटकोपरमधील सोनिया गांधी नगर व आझाद नगर, टेकडी क्र.४ येथील कामांचा समावेश आहे.
घाटकोपर उपनगरातील सोनिया गांधी नगर व आझाद नगर, टेकडी क्र.४ येथील काम अत्यंत तातडीचे व अतिधोकादायक असल्याने ही कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत नियुक्त केलेल्या कंत्राटदारामार्फत करण्याकरिता महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना कळवण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक असणारा निधी महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे नमुद केले होते. त्यानुसार एमएसआरडीसीच्या माध्यमातून सोनिया गांधीनगर व आझाद नगर, टेकडी क्रमांक आदी ठिकाणे पूर्ण करण्यात आली आहेत. दरड प्रवण क्षेत्रात जिओ नेटींगचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर महापालिकेच्या वतीने खर्चापोटी ९ कोटी १५ लाख रुपयांना निधी एमएसआरडीसीला अदा करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.