Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यस्वयंपाकघरातील मदतनीस...

स्वयंपाकघरातील मदतनीस…

अंजली पोतदार : मुंबई ग्राहक पंचायत

दिमानव काय खायचे? कच्चे मांस, फळे, फुले, पाने वगैरे. चुकून लागलेल्या आगीत जळालेल्या प्राण्यांचे मास खाताना त्याच्या लक्षात आले की, या मासाची चव जास्त चांगली आहे. नंतर तो अग्नी निर्माण करायच्या मागे लागला. त्यात यश मिळाल्यावर मात्र तो अन्न शिजवून खायला लागला. हत्यारांनी कापणे, दगडाने ठेचणे, बारीक वाटणे इ. क्रिया करणे त्याला जमू लागले. त्यातून पुढे चूल, स्टोव्ह, गॅस, कुकर, इलेक्ट्रिक शेगडीपर्यंत मजल गेली. त्याच्याबरोबरीने मिक्सर, फूड प्रोसेसर, ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर (भांडी घासायचे मशीन) इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. या सर्व यंत्रांमुळे माणसाचे श्रम नक्कीच कमी होतात, म्हणून तर या सर्व उपकरणांना ‘स्वयंपाकघरातील मदतनीस’ म्हणतात. हल्ली बरीच मंडळी शिक्षण, कामधंद्यानिमित्त परदेशी जातात. काही तिथेच स्थायिकही होतात. परदेशात भारतासारखे मनुष्यबळ उपलब्ध नसते. असलेच तरी ते फार खर्चिक आणि न परवडण्याजोगे असते. त्यामुळे तिथे या मदतनीसांची उपयुक्तता खूपच असते. माणूस हा मुळातच अनुकरणप्रिय प्राणी असल्यामुळे परदेशी जाऊन आल्यावर अनेकजण ही उपकरणे आपल्याकडेही असावी, असा आग्रह धरतात.

एखाद्या मोठ्या दुकानात जिथे अशी उपकरणे मिळतात तिथे तुम्ही भेट दिली असेलच. किती प्रकारची उत्पादने आणि प्रत्येकाचे वेगवेगळे ब्रॅण्ड्स! साधा कुकर घेतलात तरी त्याचे १५-२० प्रकार आणि ब्रॅण्डस. मिक्सर तर अगदी वीतभर उंचीपासून दोन फूट उंचीपर्यंतचे. फूड प्रोसेसरमध्ये कापणे, चिरणे, वाटणे, कणिक मळणे या गोष्टी होतात. एअर फ्रायरमध्ये पदार्थ कमी तेलात तळून येतात. डिश वॉशरमध्ये काचेची, धातूची लहान-मोठी भांडी घासून- पुसून बाहेर येतात. कचरा-लादी करणारा रोबोट म्हणजे तर एक नुसती तव्याएवढी तबकडी-नुसते बटण दाबले की घरभर फिरून घर चकचकीत करणारी! मोठमोठे डबल डोअर फ्रीज बघूनच छाती दडपून जाते. उत्पादनात इतके वैविध्य असते की, धड निवडही करता येत नाही. शिवाय भेट म्हणूनही कितीतरी अशी उत्पादने आपल्या घरात येऊन पडत असतात. तरी सुद्धा तुम्ही जर सच्चे ग्राहक असाल तर खरेदी करताना आपल्या पर्यावरणाचाही सातत्याने विचार करत असाल. त्यामुळे “गरजेइतकीच खरेदी, शाश्वत जीवनशैली, उपभोगावर संयम” ही तत्त्वे रक्तात भिनलेली असतील.

स्वयंपाकघरातील मदतशील उपकरणे घेताना पुढील मुद्दे नक्की लक्षात ठेवा.

  •  शक्यतो आपण अनुभवलेल्या, माहीत असलेल्या कंपन्यांची उत्पादने खरेदी करावीत.
  •  मिक्सर, फूड प्रोसेसर घेताना त्याची शक्ती (वॅट) बघावी. सामान्य शक्ती ५०० वॅट असते. जास्त वापर असल्यास १००० वॅटच्या शक्तीचा घ्यावा. जशी वॅट वाढते तशी किंमत वाढते.
  • मिक्सर ग्राईंडरच्या मोटरची गती १८,००० ते २३,००० आरएमपी असल्याचे बघून घ्यावे. ब्लेडची गुणवत्ता पाहावी. ओव्हरलोड संरक्षण पाहावे. क्षमतेपेक्षा जास्त वाटण झाल्यास मोटर जळून मिक्सर बिघडतो.
  •  फ्रीज घेताना त्याचे स्टार रेटिंग बघावे. जितके जास्त स्टार तितकी वीज बचत जास्त. म्हणजे वापरलेली वीज ही पदार्थ थंड करण्यासाठी जास्तीत जास्त वापरली जाते. त्यामुळे विजेचा अपव्यय टळून बिल कमी येते. ऑटो डीफ्रॉस्ट आहे की, आठवड्याने जमलेले पाणी काढून टाकावे लागते, याची खात्री करावी. फ्रीज घेताना आपली गरज बघून त्याचा लहान, मोठा आकार, डीप फ्रीजची क्षमता, सिंगल डोअर की डबल डोअर, हे ठरवून घ्यावे.
  •  ही सर्व इलेक्ट्रिक अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्यामुळे वापरणाऱ्यांची सुरक्षितता पाहणे अतिशय आवश्यक. त्यासाठी आयएसआय, बीआयएस, सीआरएस यांसारखी सुरक्षिततेची मानके असलेली चिन्हे असणे महत्त्वाचे. उपकरणाचे पूर्ण परीक्षण केल्यानंतरच ही चिन्हे उत्पादनांना दिली जातात.
  • परदेशातून आणलेल्या किंवा भारतातून परदेशात नेलेल्या उपकरणाचे पुरवठा विद्युत दाब वेगळे असते. त्यामुळे परदेशातून आणलेली उपकरणे वापरताना स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तोही पॉवर रेटिंगचा वापरावा लागतो. त्यामुळे गैरसोय होते. जास्त वाटण झाल्यास मोटर जळून मिक्सर बिघडतो.
  • ही उपकरणे विकत घेताना कंपनीची विक्रीपश्चात सेवा देणारी केंद्र आपल्या जवळपास आहेत का ते पाहावे. गॅरेंटी, वॉरन्टी कालावधी कळण्यासाठी पावती आणि वापर पुस्तिका (ऑपरेशन मॅन्युअल) जपून ठेवावी.
  • आपल्या स्वयंपाकघरात ही उपकरणे ठेवण्याची जागा निश्चित करून, मोजमाप करून मगच विकत घ्यावी.
  •  मुख्य म्हणजे ही सर्व उपकरणे विकत घ्यायच्या आधी ती कशी वापरायची हे समजून घ्यावे आणि ते आपल्याला जमेल का, याचाही विचार करावा. के-लादी करणारा रोबो वाटेत काही अडथळा आला की, तिथेच गोल गोल फिरत राहतो. तो अडथळा वाकून दूर करणे, कचरा काढल्यानंतर पाती साफ करणे, डिश वॉशरमध्ये भांड्यांचे खरकटे साफ करून ती शिस्तशीर मांडणे, एअर फ्रायरमध्ये तळण झाल्यावर त्याची सफाई करणे इत्यादी वेळच्या वेळी नाही झाले तर हे मदतनीस रुसतात, बिघडतात आणि आपल्या कामाचा खोळंबा होतो, हे लक्षात घ्यावे.
  • स्वयंपाकघरातील मदतनीसांची खरेदी उगाच चंगळवादी वृत्तीने नको, ती पूर्ण विचारांतीच करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -