ठाणे ग्रामीण भागातील ५ हजार ४३० जलस्त्रोतांची तपासणी
ठाणे (प्रतिनिधी): राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची, वितरण बिंदूच्या (शाळा, अंगणवाडी, घरे इत्यादी) पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
जीबीएस विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत २ हजार ३६५, ग्रामपंचायत कार्यालय ४३१, शाळा १ हजार २६९, अंगणवाडी केंद्र १ हजार १५२, आरोग्य केंद्र ३३, उपकेंद्र १८० असे एकूण ५ हजार ४३० जल स्त्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान ५५ लिटर पाणी प्रतिदिन प्रति व्यक्ती विहित गुणवत्तेचे पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, त्या आनुषंगाने जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सातत्यापूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आले आहे.
ग्रामीण जनतेला गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम ग्रामीण भागात गावागावात राबविण्यात यावा माद्वारे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची व घरगुती नळ कनेक्शन द्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याची रासायनिक तपासणी वर्षातून एकदा व जैविक तपासणी वर्षांतून दोनदा प्रयोगशाळेत जमा करण्यात यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रमोद काळे यांनी केले आहे.