प्रा. जयसिंग यादव
भारतीय रेल्वेचा इतिहास म्हणजे प्रगतीची अस्सल गाथा. तिच्या विद्युतीकरणाच्या प्रारंभाला शंभर वर्षे पूर्ण झाली. वाफेच्या इंजिनापासून विद्युतकर्षणाच्या शांत पण बलशाली शक्तीपर्यंत झालेला प्रवास अभियांत्रिकीच्या उत्कृष्टतेचा दाखला आहे. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मैलाचा दगड ठरणारी पहिली इलेक्ट्रिक ट्रेन व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्लादरम्यान धावली. त्याने अमर्याद भविष्याची झलक दाखवली.
रेल्वेचे विद्युतीकरण ही एक अग्रेसर तांत्रिक उपलब्धीच नव्हे, तर भारतीय रेल्वेचे वैशिष्ट्य असलेल्या प्रगतीच्या अदम्य भावनेचाही उत्सव आहे. भारतीय रेल्वेची कहाणी १८५३ मध्ये एका ऐतिहासिक क्षणापासून सुरू होते. बोरीबंदर (आताचे सीएसएमटी) ते ठाणे दरम्यानचा ३४ किलोमीटरचा पहिला प्रवास… आयात केलेल्या वाफेच्या इंजिनांनी चालणाऱ्या या सुरुवातीच्या गाड्यांनी कनेक्टिव्हिटीच्या एका नव्या युगाची सुरुवात केली. तथापि, १८९५ मध्ये भारताने एफ-क्लास स्टीम लोकोमोटिव्हसह आपली औद्योगिक क्षमता प्रदर्शित केली. ते अजमेरमध्ये तयार केलेले पहिले स्वदेशी इंजिन होते. ३८ टन वजनाचे आणि १५,८६९ रुपये खर्चून बांधलेले हे इंजिन एका नवोदित राष्ट्राच्या अभियांत्रिकी महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होते. वाफेच्या इंजिनांनी आव्हाने पेलली. कोळसा आणि पाण्यावरील अवलंबित्वामुळे ही इंजिने चालवण्यास त्रासदायक बनली आणि आधुनिक मानकांनुसार त्यांची अकार्यक्षमता लवकरच उघड झाली. विसाव्या शतकाच्या मध्यात डिझेल इंजिनांचा उदय झाला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीत क्रांती झाली. वायडीएमवर्गासारख्या अधिक शक्तिशाली, विश्वासार्ह आणि किफायतशीर डिझेल लोकोमोटिव्हमुळे रेल्वेला खडबडीत भूप्रदेशातून प्रवास करणे आणि दुर्गम भागांना जोडणे शक्य झाले. तरीही या इंजिनांना विशेषत: पर्यावरणीय स्थिरतेमध्ये मर्यादा होत्या. त्यामुळे स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम उपाय म्हणजे विद्युतीकरणाचा मार्ग मोकळा झाला. भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची शताब्दी साजरी करत असताना भूतकाळातील घडामोडी विसरता येणार नाहीत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ तारखेला सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेबाबत कोणत्याही प्रकारची मोठी घोषणा करण्यात आलेली नाही; पण अर्थसंकल्पात मिळालेल्या तरतुदीनंतर भारतीय रेल्वेने प्रवास सुधारण्यासाठी आपली योजना जाहीर केली. भारतीय रेल्वे पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये शंभर अमृत भारत, ५० नमो भारत आणि दोनशे वंदे भारत ट्रेन (स्लीपर आणि चेअरकार प्रकार) चालवणार आहे. या गाड्यांमुळे देशातील रेल्वे कनेक्टिव्हिटी पूर्वीपेक्षा खूप चांगली होण्याची अपेक्षा आहे. देशभरात रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी १७ हजार पाचशे नॉन-एसी जनरल आणि स्लीपर कोच तयार करण्याची योजना आहे. एकीकडे रेल्वे फक्त श्रीमंतांसाठीच्या योजना वाढवत असल्याचे चित्र असताना आता या योजनेमुळे सामान्य प्रवाशांनाही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे संकेत आहेत. या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा उत्तम अनुभव देणे आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील वाढता दबाव कमी करणे हा आहे.
अर्थसंकल्पात सरकारने भारतीय रेल्वेमध्ये अनेक सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वेला एकूण २.५२ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ४.६ लाख कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांवरही भर दिला आहे. ते पुढील चार ते पाच वर्षांमध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे, स्थानकांची पुनर्बांधणी, विविध उड्डाणपूल आणि अंडरपास बांधणे यांचा समावेश आहे. ३१ मार्चपर्यंत असे १४०० डबे तयार होतील. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दोन हजार नवीन जनरल कोच तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय एक हजार नवीन उड्डाणपूल बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय रेल्वे या आर्थिक वर्षाच्या अखेरीला शंभर टक्के विद्युतीकरण साध्य करेल. सुरक्षिततेसाठी गुंतवणुकीवर सरकारचे लक्ष अधोरेखित करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख १६ हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत १.६ अब्ज टन मालवाहतूक क्षमता गाठून रेल्वे एक मोठा टप्पा पार करणार आहे. त्यामुळे चीननंतर भारतीय रेल्वे मालवाहतूक करणारी जगातील दुसरी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था बनली आहे.
प्रत्येक तांत्रिक झेप देशाच्या वाहतूकविषयक पायाभूत सुविधा बळकट करत आहे. त्याचा पर्यावरणावरील प्रभाव कमी करत आहे आणि जागतिक स्तरावर देशाचे स्थान बळकट करत आहे. विद्युतीकरणामुळे भारताचे रेल्वेमार्ग प्रकाशित होतात. त्यामुळे शाश्वत आणि समृद्ध भविष्याचा मार्ग मोकळा होतो. चाकाच्या शोधामुळे जग किती तरी पटीने वेगाने पुढे जाऊ लागले. या वेगाला सप्टेंबर १८२५ मध्ये नवी दिशा मिळाली. त्यानंतर २८ वर्षांनी १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात पहिल्यांदा ट्रेन धावली. ७२ वर्षांनंतर, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी, भारतीय रेल्वेने आणखी एक अध्याय जोडला आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी इलेक्ट्रिक ट्रेन चालवून नवीन विक्रम केला. आता २०२५ मध्ये भारतात रेल्वेच्या विद्युतीकरणाची १०० वर्षे पूर्ण झाली. देश आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या शंभर विद्युतीकरणांच्या मार्गावर आहे, जो भारतीय रेल्वेच्या उपलब्धींमध्ये एक मैलाचा दगड ठरेल. ही कामगिरी भारतातील पहिल्या रेल्वे प्रवासाप्रमाणेच ऐतिहासिक आहे आणि भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणात प्रगतीचे शतक आहे. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचा अवलंब करण्यासाठी भारताला जास्त वेळ लागला. पहिली इलेक्ट्रिक पॅसेंजर ट्रेन १८७९ साली जर्मनीत धावली होती; पण हे तंत्रज्ञान भारतात पोहोचायला ४६ वर्षे लागली. इलेक्ट्रिक इंजिने फार कमी काळात आपली उपयुक्तता सिद्ध करण्यात यशस्वी झाली. ही इंजिने अधिक शक्तिशाली, वेगवान आणि कार्यक्षम आहेत. कमी देखभालीसह प्रदूषणमुक्त आहेत आणि जड गाड्या सहज खेचू शकतात.
सुरुवातीच्या काळात विद्युतीकरणाची किंमत जास्त होती; परंतु शहरी रहदारीसाठी आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरले. मुंबईच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाहतुकीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम उपाय शोधणे आवश्यक होते. वाफेची इंजिने पुणे आणि नाशिककडे जाणारे तीव्र उतार हाताळू शकली नाहीत. त्यामुळे विद्युतीकरणाची गरज आणखी वाढली. १९०४ मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारचे मुख्य अभियंता डब्ल्यूएच व्हाईट यांनी मुंबईतील दोन प्रमुख रेल्वे नेटवर्क, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे आणि बॉम्बे बडोदा आणि मध्य भारत रेल्वे यांचे विद्युतीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्लादरम्यान १५०० व्होल्ट डायरेक्ट करंटवर १६ किलोमीटर अंतरावर धावली. हे भारतीय रेल्वेच्या स्वच्छ आणि आधुनिक वाहतुकीच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. या हालचालीमुळे इलेक्ट्रिक रेल्वे सेवा चालवणारा भारत हा जगातील चोविसावा आणि आशियातील तिसरा देश बनला आहे.
मुंबईबरोबरच दक्षिण भारतानेही विद्युतीकरणाच्या दिशेने पावले टाकली. भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशातील फक्त ३८८ किलोमीटरच्या रेल्वेलाईनचे विद्युतीकरण करण्यात आले होते. ते मुख्यत्वे मुंबई आणि मद्रासभोवती केंद्रित होते. मुंबईने विद्युतीकरणात आघाडी घेतली असताना पूर्व भारतात ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली. भारतीय रेल्वेने १९५४ मध्ये युरोपियन विद्युतीकरण मॉडेल्सचा अभ्यास केला आणि प्रदेशासाठी ३००० व्होल्ट प्रणाली निवडली.
डिसेंबर १९५७ मध्ये हावडा आणि शेओराफुलीदरम्यान पूर्व भारतातील पहिल्या विद्युतीकृत ट्रॅकचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे विद्युतीकरणाचा देशावर खोल आणि दीर्घकालीन प्रभाव पडला. हे वाहतुकीचे स्वच्छ मॉडेल आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन मिळते. विद्युतीकरणामुळे वाहतूक वेगाने, सुरक्षित आणि पर्यावरणाचे रक्षण करून होते. लाईन हाऊल खर्चात बचत होते. रेल्वे नेटवर्क अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनते. याशिवाय, कार्बन उत्सर्जन कमी करून शाश्वत विकासाला हातभार लावते. कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी केल्याने मौल्यवान अशा परकीय चलनाची बचत होते. त्यामुळे राष्ट्राची आर्थिक ताकद सुनिश्चित होते. गेल्या काही दशकांमध्ये भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला अभूतपूर्व गती मिळाली. २०१४-१५ दरम्यान दररोज सुमारे १.४२ किलोमीटर विद्युतीकरण करण्यात आले. या कालावधीमध्ये भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज नेटवर्कवर अंदाजे ४५,२०० मार्ग किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण केले. २०२३-२४ दरम्यान दररोज सुमारे १९.७ किलोमीटर विद्युतीकरणाचा विक्रम करण्यात आला. देशातील रेल्वे नेटवर्कला चालना देण्याच्या आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे लवकरच काही मोठी पावले उचलणार आहे.