ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज
नाम हे सच्चिदानंद-स्वरूप आहे. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वत: मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे! खरोखर, तुम्हाला मी काय सांगू! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात ‘मी’ पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते.
नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे. कसे ते पाहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर नाही शिकलात तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे.
नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत् म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात भगवंताकडे पोहोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दु:खे नाहीशी होतात, कारण या दु:खांचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दु:ख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की, दु:ख त्या ठिकाणी कसे राहू शकेल?
तात्पर्य : प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे.