Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूज‘कंपाउंडर’कडून औषध घेतल्याने त्यांची पोटदुखी कधीच थांबणार नाही

‘कंपाउंडर’कडून औषध घेतल्याने त्यांची पोटदुखी कधीच थांबणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

माजी आमदार राजन साळवींचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश

कोकणात उबाठाला जबर धक्का

ठाणे : मराठी माणसाला तो पुरस्कार दिला त्याचा अभिमान पाहिजे, मात्र माझ्या द्वेषाने पछाडलेल्या लोकांनी महादजी शिंदे यांचा अपमान केला, साहित्यिकांचा अपमान केला आणि शरद पवार यांचाही अपमान केला. ही पोटदुखी कधीच थांबणार नाही कारण ते ‘कंपाउंडर’कडून औषध घेतात त्यांना चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं पाहिजे, अशी खरमरीत टीका शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ठाण्यातील आनंद आश्रम येथे राजापूर लांजा मतदार संघाचे उबाठा गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी पुरस्कारांवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.

शिंदे म्हणाले की, एका मराठी माणसाचा मराठी माणसाकडून सत्कार केला तर त्यांना पोटदुखी झाली. त्या सोहळ्यात शरद पवार यांनी संस्कृती दाखवली आणि या लोकांनी विकृती दाखवली, अशी बोचरी टीका शिंदे यांनी संजय राऊतांवर केली. ज्याप्रमाणे मोघलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसायचे तसे मी आता यांना दिसतोय. माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. एकनाथ शिंदे जिथे उभा राहतो तिथून लाईन सुरु होते ती जनसेवेची लाईन असते. एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास राज्याने पाहिला आहे. आमच्याकडे येताय त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जाताय याचा विचार करायला हवा, असे शिंदे म्हणाले. विकासाचा अजेंडा चालवला म्हणून राज्यातील जनतेने देदिप्यमान विजय मिळवून दिला. कोकण भगवमय झाले पाहिजे. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले. कोकणाचा राहिलेला विकास आपल्याला करायचा आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा एकदा गुहेत परतला असा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राजन साळवी यांचे स्वागत केले. साळवी हे रत्नागिरीचे नगराध्यक्ष होते. तीनवेळा आमदार होते. आताही आमदार झाले असते. किरण सामंत आणि उदय सांमंत म्हणाले होते की साळवींना बोलवा आणि तिकिट द्या, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष असून कोणाच्या मालकीचा नाही. इथं राजाचा मुलगा राजा नाही बनणार तर जो काम करेल तोच राजा बनेल. पण जी वागणूक दिली गेली म्हणून अडीच वर्षांपूर्वी उठाव करावा लागला, लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षात किती काही काम केले. मविआने जे प्रकल्प बंद पाडले ते सुरु केले. लोकाभिमुक योजना आणल्या, म्हणून अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे शिंदे म्हणाले. ज्या पक्षाच्या विचारांना लागली वाळवी तिकडे कसा राहील राजन साळवी, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासुन मला वाटत होत राजन साळवी माझ्या सोबत यायला हवेत पण तेव्हा काही लोक आडवे आले होते. आता सगळे स्पीड ब्रेकर दूर करुन ते आले, असे शिंदे म्हणाले.

राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाने कोकणात उद्धव गटाला खिंडार !

राजन साळवी यांनी यावेळी एकनाथ शिंदे राजकीय गुरु असल्याचे सांगितले. राजापूर, लांजा, साखरपामधील जवळपास ७०० कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यात उपजिल्हाप्रमुख, पंचायत समिती, नागराध्यक्ष, नगरसेवक सभापती युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा पूर्ण भगवामय करायचा आहे, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -