मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा शूटिंगवरुन परतत असताना २४ डिसेंबर २०२४ रोजी अपघात झाला होता. पोयसर मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला होता. अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. अभिनेत्री उर्मिलाने या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मागणी केली तरी पोलिसांनी अद्याप अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवलेले नाही ही बाब निदर्शनास आणून देत उर्मिलाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज दाखवण्यासाठी मुंबई पोलिसांना निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे. अपघाताचा तपास स्टेट सीआयडी (क्राईम ब्रँच) यांच्याकडे द्यावा, अशीही मागणी याचिकेद्वारे अभिनेत्री उर्मिलाने केली आहे.
यमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्यासमोर अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या याचिकेची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी समता नगर पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधीला अथवा त्यांच्या वकिलाला दोन आठवड्यांनी न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. समता नगर पोलीस ठाण्याची बाजू समजल्यानंतर उच्च न्यायालय याचिकेतील मागणीबाबत त्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे.