Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Rail Neer Bottle : मध्य, पश्चिम रेल्वेवर रेल नीर बाटलीबंद पाण्याचा तुटवडा

Rail Neer Bottle : मध्य, पश्चिम रेल्वेवर रेल नीर बाटलीबंद पाण्याचा तुटवडा

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनतर्फे रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून रेलनीरचे उत्पादन अंबरनाथ येथील कारखान्यात करण्यात येत आहे. येथे तयार केलेल्या बाटल्या मध्य रेल्वेच्या मुंबई आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात पुरवल्या जातात. मात्र अंबरनाथ येथील ‘रेलनीर’ कारखान्याच्या नूतनीकरण आणि वार्षिक देखभालीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेलनीर बाटलीबंद पाण्याचा मध्य, पश्चिम रेल्वेवर तुटवडा निर्माण होऊ लागला आहे.



मुंबई महानगरात तापमान वाढत असल्याने उन्हाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. त्यामुळे बाटलीबंद पाण्याने तहान भागविण्याकडे अनेकांचा कल आहे. परिणामी बाटलीबंद पाण्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. परंतु, मुंबईतील रेल्वे स्थानकांत ‘रेलनीर’ पाण्याच्या बाटल्यांचा अपुरा पुरवठा होऊ लागला असून रेलनीरच्या बाटल्या रेल्वे स्थानकातील स्टाॅलवर उपलब्ध नाहीत. इतर रेल्वेने अधिकृतरित्या रेल्वे स्थानकात रेलनीर व्यतिरिक्त मान्यताप्राप्त खासगी बाटलीबंद पाणी विकण्यास परवानगी दिली आहे.मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कसारा / कर्जत, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व रेल्वे स्थानकांत, हार्बर मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके, वापी आणि वलसाड स्थानकांत ‘रेलनीर’ बाटलीबंद पाण्याचा पुरवठा केला जातो.


परंतु, सध्या रेलनीरचे उत्पादन घटल्याने बाटलीबंद पाण्याचा अपुरा पुरवठा होत आहे. याबाबत प्रवाशांनी ‘एक्स’वर तक्रार केली आहे. दरम्यान, रेलनीरचा साठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागीय कार्यालयाने ‘बिस्लेरी’, ‘स्वीट’, ‘झुरिका’, ‘रोकोको’, ‘क्लिअर’ यांसारख्या इतर खासगी बाटलीबंद पाणी स्टाॅलवर विकण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक खात्यातून सांगण्यात आले.

Comments
Add Comment