Monday, April 21, 2025

ll ओम कालभैरवाय नमः ll

ऋतुजा केळकर

‘असे ज्या वरी भैरवाची छाया
ना अपमृत्यू बाधे
छळे ना दुष्ट माया
जायच्या घरी भैरवाचा वास आहे
त्याला भीती कळीकाळाची ती नाही
नको रे मना विसरू त्या भैरवाला
मुक्तीच्या मार्गात तरेल तोच तुजला’

आज नवीन वर्षातील दुसरी कालाष्टमी म्हणून भैरवाच्या चरणी नकळत अर्पण झालेले हे माझे काव्य सुमन मलाच कुठेतरी विचारत राहिले, ‘ज्या कालभैरवाचे तू स्तुतिगान करत आहेस त्याचे उगम तर जाऊ दे पण त्याचे अस्तित्व तरी पूर्णपणे तू जाणून आहेस का?” मग सुरू झाला माझा प्रवास एक वैचारिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील. त्यात जो माझ्या अल्पमतीस कळला तो हा ‘कालभैरव’ मी आज आपल्या पुढे रेखाटण्याचा छोटासा यत्न करीत आहे. खरंच त्रिदेव आपल्याला लहानपणापासून माहिती आहेत. आदिमाया, आदिशक्ती, जगतजननी आई अंबा मातेची देखील आपल्याला तोंडओळख आहे पण ‘कालभैरव’ हे एक असे दैवत आहे की, ज्यांच्याबद्दल मी पामराने काय बरं लिहावे? आज आपल्यापर्यंत त्याची महती पोहोचवण्याचे माध्यम बनण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे. एका पुराण कथेनुसार कालभैरव हा शिव पार्वतीचा पुत्र मानला जातो तर दुसऱ्या कथेनुसार शिवाने एका भक्ताला वरदान दिल्यामुळे कालभैरवाची उत्पत्ती झाली. असे हे म्हटले जाते की, कालभैरव हा काशिविश्वेश्वराचा दूत आहे आणि तो काशीच्या सीमेवर तो द्वारपाल म्हणून उभे आहेत. अत्यंत उग्र असे रूप असलेले हे दैवत एकदा का कृपावंत झाले की, आपल्याला कळीकाळापासून रक्षित करते असा त्याचा महिमा आहे. भूतप्रेत आणि दुष्ट शक्ती यांचा हे दैवत विनाश करते. वाराणसी म्हणजेच काशिस्थित यांचे मंदिर हे एक पवित्र स्थान म्हणून हिंदू धर्मात मान्यताप्राप्त आहे.

या कालभैरवाचे मी काय वर्णन करू, त्याचे विशाल नेत्र हे जरी गुढ वाटत असले तरी जरा लक्षपूर्वक पहिले तर लक्षात येईल की, त्या नेत्रातून पृथ्वीच्या प्रारंभाचा आभास होईल. क्षणभर जरी त्याच्यासमोर आपण ध्यानमग्न अवस्थेत बसलो तर जाणवेल आपल्याला की, आत्म्याच्या भोवतालचे मीपणाचे वलय धुक्यासारखे वितळत जाऊन आपल्या जीवात्म्या आणि परमात्म्यामधील कमी-कमी होणारे अंतर. विषयासक्त कामभावनेने जगणारे आपण कुठेतरी त्या काळभैरवाच्या चरणी आपोआपच स्वतःला अर्पित करतो. मला जाणवलेला तो कालभैरव म्हणजे, त्याच्या नुसत्या स्मरणाने भक्तीत असो नाहीतर प्रीतीत आपल्याला विकलतेच्या प्रांगणात एकटे पडून आपले निर्माल्य न होऊ देता आपल्या चहूबाजूला मधुर कृपाशीर्वादाचा गंध दरवळत ठेवतो तो ‘कालभैरव’. कुणाला कदाचित अतिशयोक्ती वाट्टेल पण कर्तव्यकर्मे न सोडता व्यावहारिक सावधानता बाळगून म्हणजेचे पापाची वाटचाल न करता जो या भैरवाची आराधना करतो त्याला कधी काहीही कमी पडत नाही. शरीराचा दिवा करून प्राणाची वाट पेटवून प्रकाशाच्या मूळ गाभ्याची ज्याला आस लागते तोच फक्त काळभैरवाच्या आराधनेत लीन होतो. निष्काम भक्तीच्या वाटेवर जाता जाता विश्वात्मकतेचा पाडाव म्हणजे कालभैरव. शिस्त, गांभीर्य आणि अध्यात्मिक साधनेची परिपूर्णता म्हणजे कालभैरव. क्षणभंगुर यशाकरिता जर का त्याला वेठीस धराल तर जीवनाच्या उच्च मूल्यांकनापासून तुम्ही वंचितच राहाल पण लोभाच्या आणि लाभाच्या पल्याड जाऊन जर या देवतेची कास धराल तर मुक्तीची कवाडे तुम्हाला उघडी होतील हे त्रिकालबाधित सत्य आहे.

आयुष्याची कलाकृती ही आपल्या कर्मातूनच घडते पण त्याचा शिल्पकार हा सर्वांबद्दल शुभंकर विचार करणारा आणि चिंतनप्रणव असणे जितके गरजेचे आहे तितकेच तो वैचारिकरीत्या प्रगल्भ असणेही गरजेचे असते हे जितके सत्य आहे तितकेच कालभैरवाचे काही गुण त्याच्या अंगी असणे गरजेचे आहे आणि ते म्हणजे आत्म्याच्या दयारूपी कापसाचे आत्मसमाधानाचे सुत करून सत्याच्या आणि नियम बद्धतेच्या तेलात भिजून जर जीवेभावे संपूर्ण समर्पणाने त्याला जो शरण जाईल तर प्रत्येक शुभकार्यात त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. हे सारे गुण आणि हे सारे मार्ग अवलंबिले तर माझा कालभैरव कुणाच्याही पाठीशी अगदी सहजगत्या उभा राहील, ही त्रिकालाबाधित सत्य आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -