कल्याण : डोंबिवली (पूर्व) ग प्रभाग क्षेत्रातील बिगर निवासी मालमत्तांना वारंवार भेटी व नोटीस देऊनसुद्धा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाचे सहा. आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी यांनी थकबाकी पोटी बिगर निवासी मालमत्ता सिल करण्याची धडक कारवाई बुधवारी केली.
यामध्ये डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड, कस्तुरी प्लाझा येथील शितल ॲकॅडमी व सोहम क्लासेस सील करण्यात आले. त्यांची २० लाख ५८ हजार १९१ इतकी थकबाकी आहे. तर फ प्रभागात सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने श्रीजी पॅलेसमधील सदनिका क्रमांक ५०१, ही मालमत्ता १ लाख ५५ हजार २६६ इतक्या थकबाकीपोटी सील केली. तसेच ओरिएंट सोसायटी येथील सदनिका क्रमांक c /४०९ ही थकबाकी रक्कम रु. १ लाख ३९७ इतक्या थकाबाकीपोटी सील करण्यात आली.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार अ प्रभागाचे सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी मौजे मांडा-टिटवाळा, सांगोडा रोड स्मशानभूमी लगत सुरू असलेल्या ७ खोल्यांचे वीट बांधकाम तसेच १२३ दगडी जोत्यांच्या फाऊंडेशनवर निष्कासनाची कारवाई दिवसभरात केली. ही कारवाई महापालिका पोलीस पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.