मुंबई : मुंबईत जनगणनेच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे उघड झाले आहे. दुपारच्या वेळी घरातील तरुण वर्ग जेव्हा शिक्षण किंवा नोकरी – व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर असतो त्याचवेळी काही बोगस सरकारी अधिकारी निवासी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. बनावट सरकारी कागदपत्र दाखवून जनगणना सुरू आहे, असे सांगून माहिती घेण्यासाठी घरात प्रवेश मिळवतात. पिण्यासाठी पाणी मागतात. घरातील सदस्य बेसावध आहेत याचा अंदाज येताच शस्त्राचा धाक दाखवून लुटालूट करतात. काही ठिकाणी हाच प्रकार आरक्षणासाठी सॅम्पल सर्व्हे सुरू आहे अथवा आयुष्मान भारत वा अन्य एखाद्या सरकारी योजनेसाठी माहिती हवी आहे असे सांगून केला जात आहे. राज्यात जनगणना अथवा कोणत्याही सरकारी सॅम्पल सर्व्हेचे काम सध्या सुरू नाही. यामुळे कोणीही जनगणना अथवा सॅम्पल सर्व्हेसाठी माहिती मागत असल्यास जास्त बोलणे टाळा आणि दार बंद करुन घ्या; हा सुरक्षित राहण्याचा एक सोपा पण प्रभावी पर्याय आहे.
सरकारच्या कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपात माहिती हवी असल्याचे कारण सांगून बनावट सरकारी अधिकारी घरात प्रवेश करतात. आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, फोटो, बोटांचे ठसे ही माहिती घेऊन नंतर त्याचा सायबर घोटाळ्यांसाठी गैरवापर करतात असेही उघड झाले आहे. केंद्र किंवा राज्य सरकार कोणत्याही कल्याणकारी योजनेसाठी फोटो, बोटांचे ठसे अशा स्वरुपाची खासगी माहिती घरोघरी जाऊन घेत नाही. अधिकृत सरकारी केंद्रावर नागरिकांना येण्याचे आवाहन केले जाते. या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा तसेच आवश्यक ते खबरदारीचे उपाय करुन माहितीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळे नागरिकांनी बनावट सरकारी ओळखपत्र आणि इतर कागदपत्र दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध रहावे; असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.