माझे कोकण : संतोष वायंगणकर
मुंबईला लागून असलेला पालघर, रायगड आणि गोवा राज्याच्या सिमेवरच सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हे म्हणजे कोकणातील हे सर्वच जिल्हे या अर्थाने पर्यटन स्थळांनी समृद्ध जिल्हे आहेत. कोकणात गेल्या काही वर्षांत पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या संख्येने कोकणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. जेव्हा उद्योग-व्यवसाय वाढतात, नव्याने उभारणी घेतात, तेव्हा निश्चितच बाकी अनेक गोष्टी त्याला चिकटून येतात. देशभरातील मोठ्या शहरांमध्ये जशी अमली पदार्थ सेवनाने तरुण पिढी नासवली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमली पदार्थ सेवनामध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी हे नशेच्या अधीन झाले आहेत. अमली सेवनाचा फार मोठा धोका निर्माण झाला आहे. कोकणामध्येही अमली पदार्थ विक्रीचे एक रॅकेट कार्यरत आहे. पोलीस यंत्रणेला अमली पदार्थ विक्री करणारे कोण आहेत याची माहिती निश्चितच असायला हवी. कोकणच्या शेजारी असलेल्या गोवा राज्यामध्ये गोवा राज्यातील पर्यटन व्यवसाय प्रचंड वाढला आहे; परंतु गोवा राज्यातील पूर्वीचा सुसंस्कृतपणा या अमली पदार्थाच्या वाढत्या प्रभावाने कुठल्या कुठे गळून पडला आहे.
नायजेरियन, रशियन यांची गोवा राज्यात गावच तयार झाली आहेत. नायजेरियनांचा मुख्य व्यवसाय हा अमली पदार्थ विक्रीचा आहे. सुरुवातीला गोवा राज्याने जगभरातील लोकांना गोव्यात सामावून घेतले. आज तीच मोठी सरकारची डोकेदुखी बनली आहे. नायजेरियनांना आवरणंही कठीण होऊन गेलं आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगत असलेल्या गोवा राज्यातून सिंधुदुर्गात अमली पदार्थ येऊ शकतात. अमली पदार्थ सप्लायर असलेल्यांना आवरण्याचं फार मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्रकिनारी चरसची पाकिटे मोठ्या प्रमाणावर सापडली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चरसची पाकिटे आली कुठून याचा शोध घेतला गेला का? अमली पदार्थांच्या बाबतीत पोलीस आणि संबंधित यंत्रणेने त्याकडे दुर्लक्ष करू नये. उलट याबाबतीत अधिक सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. अमली पदार्थांचा विळखा जाईपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोवरच अन्यत्र: ज्या कुटुंबातील तरुण या अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेले असतात, त्या कुटुंबाला ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशीच काहीशी अवस्था होऊन जाते. विशेषत: श्रीमंत कुटुंबातील तरुण-तरुणी या नशेच्या आहारी गेल्यावर त्या तरुणाला त्या अमली पदार्थ नशेतून बाहेर काढण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करूनही त्यात यश मिळतचं असं नाही. त्यामुळेच या अमली पदार्थांच्या बाबतीत सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे. आपण सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकून मोकळे होतो. पोलिसांनीच काय ते करावं अशी आपली भूमिका राहते; परंतु पोलिसांपेक्षाही याबाबतीत सामाजिक दबाव असला तर अमली पदार्थ विक्रेत्यांवर याबाबतीत आळा बसेल. समाज म्हणून बऱ्याचवेळा हे सगळं पोलिसांनी करावं म्हणून सांगून मोकळे होतो. नेमकी अशी प्रकरणे घडली की, आपले पोलीस काय करतात? असे प्रश्न विचारायला आपण मोकळे असतो, असे होता कामा नये.
कोकणातील अनेक शहरांतून आणि गावांतूनही अमली पदार्थ विक्री होते हे माहिती असूनही काहीवेळा पोलिसांकडे फार कोणी माहिती देण्यासाठी किंवा कळवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. त्याचे कारणही तसेच आहे. पोलिसांतील काहींकडून त्यांना माहिती कोणी दिली. त्याबद्दल पोलिसांकडूनच अशा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये असणाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविली जाते. यामुळेच समाजातीलही ज्यांना अशा अमली पदार्थ विक्रीचे अड्डे माहिती असले तरीही कोणीही पुढे येत नाहीत. माहिती देत नाहीत. यामुळेच अमली पदार्थ विक्रीतील रॅकेटमध्ये असणाऱ्यांवर गुन्हे दाखलच होत नाही. कोकणात पोलीस अमली पदार्थ म्हणजे गांजा एवढ्याच ज्ञानावर आणि माहितीवर थांबलेले आहेत. कोकणात फक्त गांजाच विक्री होते का? आणखी कशाची विक्री या अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांकडे होते. याचा कधीतरी पोलिसांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे. चरस, अफू, कोकेन आणखी बरेच काही कोकणात येत का? याचा शोध घेतला पाहिजे. दोन-पाच किलो गांजा पकडल्याच्या पोलिसांकडून ज्या बातम्या दिल्या जातात, त्या देखील हास्यास्पद असतात. हातभट्टीच्या दारू अड्यावर पोलिसांची धाड ही बातमीही खरं तर हास्यास्पदच असते. हे फक्त दाखवण्यासाठी वार्षिक नाहीतर मासिक पार पाडलेलं असतं. यातला गंमतीचा भाग वगळून सांगतो, भविष्यात कोकणात अमली पदार्थांचे सेवन ही फार मोठी समस्या बनू शकते. मुंबई-गोवा महामार्गावरील संशयास्पद असणाऱ्या टपरींवर काय विक्री केली जाते, काय-काय मिळतं याचीही माहिती समोर यायला हवी. यासाठीच समाज आणि पोलीस दोघांनीही अधिक सतर्क असण्याची आवश्यकता आहे.