अरविन्द दोडे
कारुण्यरसाची वृष्टी…
ते म्हणो कारुण्यरसाची वृष्टी |
की नवया स्नेहाची सृष्टी |
हे असो नेणिजे दृष्टी |
हरीची वानू ॥५.१७१॥
ती हरीची कृपादृष्टी करुणरसाचा वर्षावच आहे असं म्हणू अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असं म्हणू. हे राहू द्या. कृष्णाच्या त्या दृष्टीचं वर्णन कसं करावं हे कळत नाही, हा योगगर्भयोग आहे! सद्गुरू म्हणजे कृपासिंधू! तो तोडतो तत्काळ भवबंध. त्याच्या दैवी लीलेचे सोहळे पाहण्यासाठी भक्ती, सेवा, स्मरण, जपादी पायऱ्या चढाव्या लागतात. जीवनातल्या काट्यांच्या वाटा तोच सोज्वळ करतो. आपण सामान्य माणसं आंगाडं फाडून घोंगाडं करतो! अशी आपली अभाग्याची थोर बुद्धी. आपण शक्ती वेचली तरी सुखप्राप्तीची युक्ती अपुरी पडते. भोगविलासाचा शीण येत नाही. पाच तत्त्वांचा जन्मदाता जन्मात आठवत नाही… आणि उधार-उसनवार मोक्ष मिळत नाही. त्यासाठी करावी लागते रोकडी योगसाधना!
सर्वप्रथम विवेकबुद्धी विकसित करतात. गुरुशिवाय अन्य भाव मनात नसावा. कोणतीही साधना अखंड अन् दीर्घकाळ केल्यानं सफल होते. दुधाचं दही करण्यासाठी दह्याचंच विरजण लावावं लागतं तसा हा गुरुध्यानाचा प्रकार आहे. ध्यान कसं करावं हे गुरू शिकवतो. शिष्य शिकतो, गुरूचंच ध्यान करतो. नौका पाण्यावर चालते. पाणी नसेल तर ती वल्हवता येत नाही, पण नौकेत पाणी शिरलं तर ती बुडते. जगात, समाजात वावरताना घर, संसार, गणगोत, उद्योग-व्यवसाय, पैसा, प्रतिष्ठा, कीर्ती, विद्या, कला हवी असते, मात्र अशा गोष्टींमध्ये किती गुंतावं, हे विवेक सांगतो. ‘सत्यासत्यास मन केले ग्वाही’ असा अलिप्तपणा हवा. मधमाशी मध गोळा करते, पण ओकून टाकते. तिच्या ध्यानीमनी मधच असतं, पण ती तो गोळा करण्याचं काम एक कर्तव्य म्हणून करते. भाविक भक्तांनी तिचा आदर्श घ्यावा. ‘हे माझं नाहीये’ हा मनोभाव असावा. महादेव म्हणतात,
एतत्सर्वं परित्यज्य, गुरोरन्यन्न भावयेत्| प्रपंच मानत भरू न देता, गुरुभावानं काठोकाठ मन भरून टाकावं. पंचमहाभुतांनी बनलेला देह आणि पंचज्ञानेंद्रियांना भोगता येणारे सर्व नश्वर पदार्थ म्हणजे घरसंसार! सुखसंपत्ती भक्तानं भोगू नयेत असं नाहीये, पण त्यांचा दास होऊ नये. गुरुदास व्हावं. एक कथा आठवते – एक नवशिक्षित शिष्य होता. काही वर्षं तो गुरूंच्या आश्रमात राहिला. एकदा म्हणाला, “गुरुदेव, मला वाटतंय की तुमच्यासारखा आश्रम थाटावा. स्वत: गुरू व्हावम्. अनेक शिष्य असावेत. सर्वांनी माझा मान राखावा. सन्मान करावा.” गुरू हसले. म्हणाले, “बेटा, अनेक वर्षं साधना करावी लागते. स्वत:ची योग्यता वाढवून ज्ञानाच्या बळावर असा आश्रम उभारता येतो.” “अनेक वर्षं? आता का नाही? मी दीक्षा देऊ शकतो कुणालाही!” हे ऐकून गुरू म्हणाले, “तू या आसनावरून ऊठ. जमिनीवर उभा राहा.” तो उभा राहिला, तसे गुरू स्वत: आपल्या उच्चासनावर उभे राहिले. “आता तू मला वरच्या आसनावर बसवं.” “हे कसं शक्य आहे?” शिष्यानं विचारलं. “मी खाली. तुम्ही वरती. तुम्हाला आणखी उंचावर ठेवणं अशक्य आहे. मी स्वत:वरती उभा राहिलो तरच तुम्हाला वरच्या पायरीवर घेऊ शकतो.” “हेच मला म्हणायचंय. तुला जर वाटतंय की, आपलेही असंख्य शिष्य असावेत, तर तू आधी मोठा हो, मग इतरांना मोठं कर!”
मित्रहो, सारांश काय तर, गुरू होण्याची घाई करू नये. वर्षानुवर्षं अभ्यास, चिंतन, मनन, भक्तिसाधना करावी लागते. तेव्हा लाखात एखादा गुरुदेव होतो. गुरूची आराधना म्हणजे सर्वांगीण साधना. मला सगळं येतंय आता, असं शिष्यानं कधी म्हणू नये. हीच भक्तिधारा शक्तिपात दीक्षा मिळाल्यावर ऊर्ध्व दिशेनं वाटू लागते. धारा होते राधा! जिथं राधा तिथं योगेश्वर परात्पर जगत्गुरू श्रीकृष्ण येतोच. यालाच म्हणतात, उगमाकडे जाणं. तिथं गुरू ‘ये हृदयीचे ते हृदयी’ ज्ञानकलशातून आत्मज्ञान देतो. गुरुचरणस्मरण, गुरुचरणपूजन, गुरुचरणतीर्थसेवन, गुरुमंत्रपुरश्चरण आदी साधना भक्तिसिद्धीसाठी कराव्या लागतात. अनेक सिद्धांना परमप्राप्तीसाठी गुरूकडे धाव घ्यावीच लागते. प्रत्येक सिद्धसाधू हा आत्मज्ञानी असतोच असं नाहीये.
एवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभम्|
अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत, देवांनाही ते दुर्लभ!
देवांना जे दुर्लभ ते मानवांची दया येऊन सहजसाध्य करून ठेवलंय. हीसुद्धा श्रीगुरूकृपाच आहे. गुरूचे चरण पूजावेत, आचरण बघत बसू नये. भरतानं रामाच्या पादुकांची चौदा वर्षं पूजा केली. तो रामस्वरूप झाला. चरणांचा महिमा अगाध आहे. अज्ञानी जीवालाही ही साधना आवडावी अशी आहे. गुरूला प्रसन्न करून घेण्यासाठी काय करावं? त्याला आसन द्यावं. त्याला झोपण्यासाठी अंथरुण, पांघरुण द्यावं. वस्त्राभूषणं, वाहनं द्यावीत. गुरूच्या भौतिक गरजा ओळखाव्यात. त्या पूर्ण कराव्यात. अन्नधान्यादी शिधा यथाशक्ती अर्पण करावा. खरं तर बाह्य उपचार त्याला आवडत नाहीत, पण लोकसंग्रहासाठी, जगत्कल्याणासाठी देहधारी असताना लोकान्तात साऱ्या लौकिक गोष्टी गरजेच्या असतात. अर्थात तो बहुतेक वस्तू दानधर्मात गरिबांना वाटून टाकतो. दान हा एक धर्मनीतीचा प्रकार आहे. त्याचं फळ अनेक पटींनी मिळतं.
कुणी काहीच देऊ शकत नसेल तर देण्यासारखं मन, चित्त, हृदय तर असतं की नाही? ही संपत्ती सर्वांत मौल्यवान!
भाविक वृत्तीनं मानसपूजा करावी. तन-मन-धन अर्पण करून काया-वाचेनं त्याच्याच नामारूपात रमावं. गुरुकृपापात्र व्हावं. लोकलाज सोडून गुरूसेवा करावी, असं महादेव पार्वतीला सांगतात. गुरुपौर्णिमा वर्षातून एकदाच येते. सच्चा साधक ती रोज साजरी करतो! ‘हे माझं, ते माझं’ असं कधीही म्हणायचं नाही. श्वासात गुरुमंत्र गुंफायचा, तोच प्राणायाम समजायचा. यम, नियम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगशास्त्राची अंगं आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांना यम म्हणतात. यांच्यामुळे चित्तशुद्धी होते.
([email protected])