सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर कसा आहे हे सांगताना आम्ही नेहमी सांगतो की, परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी सत्, चित्, आनंद आहे. त्याच्या ठिकाणी असलेला हा आनंद स्फुरद्रुप आहे. आनंद कधीही एकटा राहणार नाही. तो सतत स्फुरत असतो म्हणून “एकोहं बहुस्याम् प्रजयायेम्” म्हटलेले आहे. “आपुलेच आवडी धरुनी खेळिया आप आपणाते व्याला रे” असे एके ठिकाणी नामदेव महाराजांनी म्हटलेले आहे. किती सुंदर म्हटले आहे बघा. “आपणासी आपण व्याले रे”. तो जो व्याला ना तो आपलीच आवड म्हणजे आनंद घेऊन व्याला. आवड हे आनंदाचे रूप आहे हे लक्षात ठेवायचे. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची आवड असते. त्याची ही आवड लक्षात घेऊन जर माणसाला प्रगती केली तर तो जगात मोठा होऊ शकतो. एखादा मुलगा अभियंता होण्याची आवड आहे, बाप वकील आहे पण मुलाला आवड अभियांत्रिकीची आहे.
बापाच्या भीतीने तो जर वकिलीला गेला तर तो फेल होईल आणि अभियांत्रिकीला गेला तर यशस्वी होईल. आपली आवड मुलांवर लादता कामा नये. आजकाल काय झालेले आहे की, आई-वडील ठरवितात मुलांना काय व्हायचं ते. मुलांनी कुठे जायचे. आता तर आई-वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी ठरवतात. पूर्वी आई-वडील ठरवत होते आता मित्रमैत्रिणी काय सांगतात यावर त्या मुलाचा जास्त विश्वास असतो. मित्र इंजिनीयरिंगला गेले तिथे आपण जावूया. मित्र कॉमर्सला गेले तिथे आपण जावूया. अशाने होते काय आवड असते एक व आपण दुसरीकडेच गेलो तर तिथे आपण यशस्वी होऊ शकत नाही.
मुलांना जर त्यांच्या आवडीप्रमाणे जीवनासत जाण्याचा मार्ग अवलंबिला तर ते प्रगती करू शकतील. सांगायचा मुद्दा काय आवड हे त्या आनंदाचे रूप आहे. प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची तरी आवड असते, कारण का? त्याच्या ठिकाणी आनंद असतो म्हणून. खरे तर आपण त्याला स्वानंद म्हणतो. स्वानंद व आनंद यात फरक आहे. स्वानंद हाच आनंदावर येतो. हा आनंद आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा होते ते सुख व हे सुख जेव्हा परिवर्तित होऊन आपल्याकडे परत येते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. लक्षांत आले की नाही, हा स्वानंद आपल्याकडेच आहे.