पुणे : पुण्यातील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला असता कुठेही बॉम्ब नसल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बावधन जवळील सुस रोड येथील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल गुरुवारी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्राप्त झाला. याबाबत मुख्याध्यापिकेने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस व बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व शाळेची तपासणी करण्यात आली. मात्र, कुठेही बॉम्ब नसल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सर्वात आधी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित झोनमध्ये नेऊन शाळेची तपासणी केली. मात्र काहीही न आढळल्याने हा कोणीतरी खोडकरपणा केला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, हा मेल कोणी केला याबाबत प्रश्न अजूनही कायम आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.