Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत

कुटुंबव्यवस्था ढासळल्यामुळे समाजव्यवस्था विस्कळीत

एकत्र कुटुंबात राहायचे म्हटले, तर बंधने आलीत, कर्तव्य-पालन आलं, शिस्त आली, जबाबदारी आली अन् कुटुंबाला अभिप्रेत असलेली मिळून-मिसळून-सर्वांशी जुळवून घेऊन वागण्याची स्वभावप्रवृत्ती आली. आज अशी बंधनं माणसाला नको आहेत.

मीनाक्षी जगदाळे

आपण सातत्याने म्हणतो सामाजिक वातावरण बदलले आहे, परिस्थिती पहिल्यासारखी राहिली नाही, लोकं बदलली, स्वभाव बदलले, माणसांमध्ये नीतिमत्ता, मूल्य राहिली नाहीत, खरेपणा उरला नाही. खरंतर समाज हा अनेक कुटुंबाचा समूह असतो. अनेक प्रकारची, अनेक जाती, धर्म, पंताची कुटुंब एकत्र येऊन एका ठिकाणी वास्तव्य करतात तेव्हा समाज तयार होतो. कोणत्याही गोष्टीची मग ती चांगली असो वा वाईट सुरुवात ही कुटुंबापासून होते. हे कुटुंब म्हणजेच घर मग ते अगदी एक-दोन माणसाचं असो वा वीस-तीस जणांचं असो, त्यातलं वातावरण, संस्कार, त्यातल्या लोकांची वागणूक, स्वभाव, त्यांची कृत्य हेच समाजावर प्रभाव टाकत असतात. या ठिकाणी आपण एक उदाहरणं घेऊ. एका चार- पाच लोकांच्या कुटुंबातील लोकं वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करतात. जसे की एक जण शाळेत शिक्षक आहे तो मुलांना ज्ञान देतो. एक जण पुजारी आहे तो लोकांना मंदिरात पूजेला सहकार्य करतो, त्यांना पुण्य कमवायला हातभार लावतो. त्याच कुटुंबातील एकजण किराणा दुकान चालवतो. लोकांना जीवनावश्यक गोष्टी पुरवून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. एकजण भाजीपाला विकतो आणि ग्राहकाला रोज ताजी भाजी पुरवतो आणि शेतकऱ्यांना पोट भरायला मदत करतो. म्हणजेच या कुटुंबातील प्रत्येकजण समाजासाठी काहीना काही योगदान चांगल्या मार्गाने देतात आणि स्वतः पण अर्थार्जन करतात. या उलट दुसऱ्या एका कुटुंबात दोन-तीन लोकं असून त्यातील एक जण दररोज लोकांना लुबाडणे, चोऱ्या करणे यासारखे कामं करतो, त्याच घरातील दुसरा व्यक्ती हा चोरून आणलेला माल विल्हेवाट लावतो आणि तिसरा या दोघांच्या चोऱ्या चुकीचा धंदा समाजापासून लपवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असतो. लोकांना वेगवेगळी कारणं देऊन समाजाची दिशाभूल करत असतो.

आता आपण राहत असलेल्या समाजात दोन प्रकारची कुटुंब आहेत जे समाजात चांगल्या वाईट गोष्टी घडायला किंवा घडवायला कारणीभूत ठरत आहेत. एखादा सभ्य सुसंस्कृत साधा माणूस जर चोर भामट्याकडून लुबाडला गेला तर तो नशिबाचा भाग म्हणून जे गेलं ते सोडून देईल. एखादा सुशिक्षित असेल तर तो कायदेशीर मार्गाने जाऊन ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. एखादा अर्धवट किंवा विकृत मनोवृत्तीचा असेल तर तो त्या चोराला शोधून मारहाण करेल, त्याला जीवे मारेल, शिवीगाळ करेल थोडक्यात तो हिंसाचार मार्ग अवलंबून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणजेच याठिकाणी दोन कुटुंबात वितुष्ठ आलं, दुश्मनी आली, भांडण आलं आणि दोन कुटुंबातील हा वाद त्यांच्या पुरता न राहता आता सामाजिक विषय बनला आहे. अशाप्रकारे छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरोघरी घडतात त्याच समाजावर छाप टाकत असतात आणि कुटुंबांना धाक न राहिल्यामुळे, मर्यादा न राहिल्यामुळे घरातील गोष्टी बाहेर येऊन त्याचं बाजारीकरण होऊ लागलं आहे आणि समाजात हे विष पसरू लागलं आहे. एकत्र कुटुंब पद्धती संपवून छोटी छोटी कुटुंब तयार होत चालल्यामुळे एकमेकांना सामावून घेणे, समजावून घेणे, सांभाळून घेणे होत नाही. मनातल्या गोष्टी घरात बोलल्या जात नाहीत तर त्या घराबाहेरील लोकांकडे व्यक्त केल्या जातात. ज्यांच्याकडे त्या व्यक्त होतात ते जर तितकेच योग्य विचारसरणीचे नसतील तर आपल्याला दिशाहीन करतात आणि आयुष्य भरकटले जाते. असे घरोघरी प्रत्येकासोबत होत असल्यामुळे समाजच चुकीच्या दिशेने वाहत जातो.

अजून एक उदाहरणं म्हणजे जेव्हा कोणत्याही घरातील पती अथवा पत्नी विवाहबाह्य संबंध ठेवते तेव्हा ती किंवा तो दुसऱ्या कुटुंबाला म्हणजेच कोणाच्या तरी पतीला अथवा पत्नीला त्रासदायक ठरत असते, कोणाचे तरी घर संसार मोडत असते. म्हणजेच एका कुटुंबातील व्यक्तीमुळे दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला त्रास होत असतो. पर्यायाने दोन्ही कुटुंबातील लोकांना त्रास होऊन समाजाचे हे घटक भविष्यात. कोणत्याही भयानक परिणामांचे बळी ठरू शकतात. आता ज्याची पत्नी किंवा जिचा पती विवाहबाह्य संबंध ठेवतोय ती व्यक्ती पण विचार करते आपण सुद्धा असे करायला काय हरकत आहे? आपण का एकटं राहायचं? आपण का अन्याय सहन करायचा आणि आपलं मन मारून जगायचं? मग ती व्यक्ती पण कुठे न कुठे स्वतःला गुंतवते, स्वतःसाठी कोणीतरी शोधते आणि अजून एक कुटुंब डिस्टर्ब होते. असं होतं होत ही विवाहबाह्य संबंधाची साखळी कधी संपत नाही आणि समाजात अनैतिक संबंध फोफावले जातात. अशावेळी आपण म्हणतो आजकाल समाजात विवाहबाह्य संबंध खूप वाढले आहेत पण त्याची सुरुवात कुटुंबापासूनच झाली हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
जेव्हा कोणतीही घटना आपल्या घराबाहेर जाते तेव्हा ती सामाजिक विषय बनते आणि समाज रचना बिघडते. म्हणूनच आपण म्हणतो घराबाहेर काही जायला नको. त्यामुळे इज्जत जाते, बदनामी होते, लोकं आपल्याबद्दल चुकीचं बोलतात, आपला अप प्रचार होतो. हे जर टाळायचं असेल तर कुटुंबाला शिस्त असणं, संस्कार असणं खूप महत्वाचे आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -