Friday, October 17, 2025
Happy Diwali

Nitin Gadkari : ऊस तोडणी यंत्रासाठी राज्याने केंद्राला सुधारित प्रस्ताव सादर करावा - गडकरी

Nitin Gadkari : ऊस तोडणी यंत्रासाठी राज्याने केंद्राला सुधारित प्रस्ताव सादर करावा - गडकरी

नवी दिल्ली : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आत्तापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या ४०% अथवा कमाल रु. ३५ लाख अनुदान देण्यात येते. उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत विनंती केली.

या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनेत सुधारणा करून सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांनी निर्देश दिले. या सुधारित प्रस्तावास केंद्र शासनाची त्वरित मान्यता देण्यात येईल असे श्री गडकरी यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment