दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीदार भाग भांडवलदारांचे शेअर्स सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळाने आपल्या मर्जीतील लोकांना देण्याचा सपाटा लावल्याचा आरोप सहकार नेते सुरेश डोखळे, सचिन बर्डे व ऊस उत्पादक सभासदांनी केला आहे.
दिंडोरी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत डोखळे म्हणाले की, थकीत भाग भांडवल शेअर्स ऊस उत्पादकांना विक्री करण्यात यावे. सन २०२३-२०२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा विषय क्रमांक १३ च्या अनुषंगाने थकीत भागभांडवल धारकांचे भाग जमा करुन घेण्याचा ठराव आवाजी मताने पारित केला होता. त्या सभेच्या इतिवृत्ताची माहीती ऊस उत्पादक सभासद सचिन बर्डे यांनी लेखी अर्जाव्दारे कादवा व्यवस्थापनाकडे २० ऑक्टोबर २०२४ रोजी मागणी केली होती. मात्र ती प्रत संचालक मंडळाने दिली नाही. वारंवार मागणी करुनही सभेच्या इतिवृत्ताची प्रत दिली गेली नाही.
३० जानेवारी २०२५ रोजी प्रादेशिक सरसंचालक (अहमदनगर) यांना पत्र देवून सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत मिळविण्याकरिता विनंती केली. परंतु त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. संचालक मंडळाच्या मनात चालले तरी काय? असा प्रश्न सर्व ऊस उत्पादक सभासदांना भेडसावत होता.
अखेरीस बर्डे यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी संचालक मंडळाला अर्ज देवून ऊस उत्पादक सभासदांसह कादवा कारखाना कार्यस्थळावर आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर संचालक मंडळाने ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सर्वसाधारण सभा इतिवृत्ताची प्रत सुपूर्द केली. त्या इतिवृत्ताच्या प्रतीमध्ये १७ हजार भागभांडवल धारक असणार्या सभासदांपैकी सर्वसाधारण सभेला फक्त १६३५ भाग धारक उपस्थित असतांना हा ठराव पारीत केला असल्याचे निष्पन झाले.
काही संचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आगामी निवडणूकीकरीता हा सर्व राजकीय डावपेच असल्याचे कबुल केल्याचा दावा बर्डे यांनी केला. आपल्या मर्जीतील लोकांना भागभांडवल खरेदी करण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याची माहीती देखील मिळाली असल्याचे बर्डे यांनी सांगत त्या संबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला. इतिवृत्ताची प्रत देण्यास तीन महिन्याचा कालावधी घेतला त्या काळात संचालक मंडळाने कायदेशिर बाबी पूर्ण केल्या.
थकीत भागभांडवल धारकांना आपली भागभांडवलाची थकीत बाकी पुर्ण करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहीर निविदा प्रसिध्द केली होती. त्याप्रमाणे तेच भागभांडवल विक्री करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहीर निविदा का प्रसिध्द केली नाही? बिगर भागभांडवल धारक, ऊस उत्पादक शेतकरी यांना प्राधान्याने भागभांडवल विक्री करावी, असे मत बर्डे यांनी व्यक्त केले. जे ऊस उत्पादक भागभांंडवला वंचित आहे त्यांना न्याय द्यावा, अन्यथा मोठे आंदोलन उभे करुन याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही बर्डे यांनी सांगितले.
यावेळी डोखळे म्हणाले, थकीत भाग भांडवल धारकांचे भाग जमा करुन घेण्यात आले. ते चुकीचे असून कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना १ ते २ वर्षांची मुदत देवून थकीत रक्कम जमा करुन घ्यावी, असे आवाहन केले असताना देखील संचालक मंडळाने सर्व थकीत भाग भांडवल धारकांंचे भाग जमा करुन भाग भांडवलाची गुपचुप विक्री सुरु केल्याचा आरोप केला.
यावेळी दिलीप जाधव, सुजित मुरकूटे, अनिल जाधव, संजन मोरे, चंद्रकांत देशमुख, गणेश हिरे, श्रीराम आहेर, भगवंत बर्डे, गोटीराम बर्डे, योगेश बर्डे, रतन बस्ते, सुनील बोराटे, काळू बर्डे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कायद्याने व नियमाने अधिकार आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असून आजमितीला आठ कोटी भागभांडवल येणे थकित आहे, भागभांडवलावर कर्ज मिळते. त्यामुळे भाग भांडवल जमा करणे गरजेचे आहे, संबंधितांना वारंवार नोटीसा दिल्या, वृत्तपत्रात जाहिराती दिल्या काहींनी पैसे भरले तर काहींनी भरले नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा केला होता की जे ऊस उत्पादक शेतकरी ऊस पुरवठा करतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. विरोधकांचे आरोप श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. – श्रीराम शेटे, चेअरमन, कादवा कारखाना