दरवर्षी दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने लागवड
अलिबाग : फळबाग लागवडीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शासनाकडून १०० टक्के अनुदान देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांकडून प्रतिसाद वाढतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असून, जिल्ह्यातील मनरेगातून एक हजार ५८८ हेक्टर क्षेत्र सध्या फळबाग लागवडीखाली आले आहे.
शासनाकडून आंबा, काजू लागवडीसाठी अनुदान देण्यात येत असल्यामुळे बागायतदारांनी याचा लाभ घेत लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. दरवर्षी दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने लागवड होत आहे. जिल्ह्यात आंबा, काजू लागवडीला अनुदान मिळत असून, सलग, तीन वर्षे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. जिल्ह्यात आंबा व काजू पिकाची लागवड सर्वाधिक असून, मनरेगांतर्गत नारळ, कोकम, फणस, सुपारी, आवळा, चिकू, चिंच या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे.
पात्रतेचे निकष लक्षात घेता, फळबाग लागवडींसाठी किमान ०.०५ ते २.० हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे. जमीन लाभधारकाच्या नावे असावी. कुळाचे नाव असेल, तर कुळाची संमती घेणे आवश्यक आहे. शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत लक्षात घेता, फळबाग लागवडीमुळे बागायतदारांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा मार्ग सापडला आहे. लागवडीसाठी शासनाकडून सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम टप्प्याटप्पाने खात्यावर वर्ग केली जाते. मनरेगांतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी कृषी विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाकडून फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जात असून, त्याचा लाभ शेतकरी घेत असल्याने जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. लागवडीचा खर्च अनुदानातून प्राप्त होत असल्यामुळे वाढता प्रतिसाद आहे.– वंदना शिंदे, (जिल्हा कृषी अधीक्षक, रायगड)