Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पनवेलमध्ये यंदा होणार भव्य शिवजयंती उत्सव

पनवेलमध्ये यंदा होणार भव्य शिवजयंती उत्सव

पनवेल (वार्ताहर) : पनवेल महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने शहरातून शिवरायांची भव्य मिरवणूक काढली जाईल. या संदर्भातील नियोजनाची बैठक आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये नुकतीच झाली.


शिवजयंतीला 'शिवराज्य' नाट्य़विष्कार होणार असून मिरवणुकीमध्ये सहभागी स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धकांची नावे घोषित करून त्यांना सन्मानित करण्याचे या बैठकीत ठरले. तसेच लोकवर्गणीसाठी रहिवाशांनी तसेच शिवप्रेमीनी पनवेल महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, चित्रकला, निबंध या स्पर्धा होणार आहेत. या मिरवणुकीमध्ये विविध शाळांनी, संस्थानी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले असून त्यासाठी पूर्व नोंदणी महापालिकेकडे करावी, असे उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगितले आहे.


सहाय्यक पोलीस निरीक्षक पटेल यांनी शिवरायांची भव्य मिरवणूक शांततेत काढून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले जाईल. शिवरायांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात केली जाईल, त्याचप्रमाणे त्यानंतरचे कार्यक्रम आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये होणार आहेत.

Comments
Add Comment