पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एआय परिषदेत (AI Summit) मोठी घोषणा केली. भारत आपल्या लार्ज लँग्वेज मॉडेल (मोठ्या भाषिक प्रतिमान) यावर काम करत आहे. त्याचबरोबर एआयवर आधारित ज्ञानाचा पूल तयार करत आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी एआयशी संबंधित मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केले. पॅरिसमधील एआय कृती परिषदेचा भारत सह-अध्यक्ष आहे.
एआय परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “एआय आता गरज बनले आहे. आमच्याजवळ जगातील सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आहे. त्याचबरोबर आपल्यावर लोकांची माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीसुद्धा आहे. यंत्रांची ताकद वाढत असल्याने काही लोक चिंतेत आहेत. पण, यात काळजी करण्यासारखं काही नाही.”
एआयमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील – मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, “एआय लाखो लोकांचे आयुष्य बदलत आहे. काळाबरोबर रोजगाराचे स्वरूपही बदलत आहे. आपल्याला एआयमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संकटाकडेही लक्ष द्यावं लागेल.”
“तंत्रज्ञान नोकऱ्या खात नाही, याला इतिहास साक्षी आहे. एआयमुळेही नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील आणि आपल्याला नव्या संधीसाठी लोकांना तयार करावे लागेल”, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी भाषणात भारताच्या एलएलएमबद्दलही (लार्ज लँग्वेज मॉडेल) माहिती दिली. भारत लवकरच आपले लार्ज लँग्वेज मॉडेल विकसित करेल, असे ते म्हणाले. भारताच्या एलएलएम मॉडेलची चर्चा होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही याबद्दल माहिती दिली होती. भारत लवकरच एलएलएम हे एआय मॉडेल विकसित करेल, असे त्यांनी म्हटले होते.