नाशिक : भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनकॅप) दहा कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात शहरात वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारत आहे. दिल्ली येथील सर्वोटेक कंपनीकडे हे काम आहे. दरम्यान महापालिकेच्या यांत्रिकी विभागाने इलक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी प्रति युनिट अठरा रुपयाचा दर ठरवला आहे.याबाबतचा प्रस्ताव महावित्तरणला दिला जाणार आहे.
नाशिक शहरात तीन खासगी चार्जिंग स्टेशन आहेत. त्याचे दरही अठरा रुपये प्रति युनिट असे आहे. त्यापेक्षा जादा दर ठेवल्यास वाहनचालक मनपा ऐवजी खासगी चार्जिंग स्टेशनला पसंती देतील. ही शक्यता लक्षात घेता विद्युत विभागाने १८ रुपये दर निश्चित केला आहे. महावितरणला हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान मनपा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन एका महिन्यात कार्यन्वित होणार असून वाहन चार्जिंगसाठी १८ रुपये प्रति युनिट दर ठरवले आहेत. वीसपैकी दोन चार्जिंग स्टेशन कार्यन्वित असून उर्वरीत स्टेशनचे काम महिनाभरात सुरु होईल. मनपा मुख्यालयाचे राजीव गांधी भवन, प्रमोद महाजन गार्डन या दोन ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. चार्जिंगसाठी दर किती आकारावे याबाबत मनपा विद्युत विभागाकडून इतर शहरांचा अभ्यास सुरु होता.यात पुणे, मुंबई, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर यांसह २१ शहरातील दरांची तपासणी करण्यात आली. साधारण १८ ते २४ रुपये प्रति युनिट असे दर आहेत.
Naresh Mhaske : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करा
d
येथे होणार चार्जिंग स्टेशन
मनपाचे सिडको विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, पूर्व विभाग कार्यालय, पश्चिम विभागीय कार्यालय, अमृतधाम फायर डेपो, सातपूर फायर स्टेशन, अंबड-सातपूर लिंकरोड, गणेशवाडी भाजी मार्केट, तपोवन, संभाजी राजे स्टेडियम, राजीव गांधी भवन, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर मैदान, कृषीनगर बॅडमिंटन हॉल.
चार्जिंग स्टेशनचे दर ठरविण्यापुर्वी इतर शहरातील दरांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार चार्जिंग स्टेशनसाठी वाहनांना १८ रुपये प्रति युनिट दर ठरवले आहेत. महावितरणला या बाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. — अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता. मनपा.