Tuesday, March 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात आजपासून मिशन बारावी; केंद्रावर अकरानंतर ‘नो एंट्री’

राज्यात आजपासून मिशन बारावी; केंद्रावर अकरानंतर ‘नो एंट्री’

१५ लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई : बारावीची परीक्षा सुरू होत असून ११ फेब्रुवारी ते २८ मार्च कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. यंदाच्या वर्षी परीक्षेत १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. यंदा ३७ तृतीयपंथी नागरिकही परीक्षेसाठी बसले आहेत. राज्यात १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

विज्ञान शाखेला ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला तीन लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला तीन लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी, तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी आहेत. टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी यंदा परीक्षा देणार आहेत. पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. नऊ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेमध्ये वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे. दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील, त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे १३ फेब्रुवारीला नाशिकमध्ये 

शिक्षणमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा, अशा शब्दांत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दडपण न घेता परीक्षेला सामोरे जा

‘मी यशस्वी होणार आहे’, असा विचार मनात बाळगून परीक्षेला सामोरे जावे. आत्मविश्वास बाळगला तरच आपल्याला परीक्षेत यश मिळणार आहे. अभ्यास कमी झाला असेल तरी प्रत्येक पेपरमध्ये अंतर आहे. त्याचा पुरेपर वापर करा. दडपण न घेता परीक्षेला सामोरे जा, असा सल्ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे समुपदेशक अशोक सरोदे यांनी दिला आहे.

राज्यात २७१ भरारी पथके

परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय दक्षता समिती कार्यरत असून विभागीय मंडळात विशेष भरारी पदके स्थापन करण्यात आली आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -