Saturday, October 25, 2025
Happy Diwali

कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश

कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना दहावी,बारावी परीक्षेत होणाऱ्या कॉपीबाबत नवीन आदेश दिले. दहावी,बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारी बाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, परीक्षा केंद्रावर आणि १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य जवळ बाळगणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.

भरारी पथकाव्दारे कॉपी मुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षीत आहे, अशा सूचना ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परिक्षा केंद्रावर पोहोचावे व परिक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे, संवेदनशील केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिका-यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.सर्व तालुक्यातील परिक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत. यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिका-यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग-प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचना दिल्या.

इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परीक्षेदिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारी ११ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंतच्या कालावधीत राज्याच्या ३ हजार ३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५ हजार १३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

Comments
Add Comment