Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीकोकण रेल्वेने प्रवास करताय? जरूर वाचा ही बातमी

कोकण रेल्वेने प्रवास करताय? जरूर वाचा ही बातमी

मुंबई: मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिराने धावतील. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होईल.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील कामामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. रोहा येथे अप आणि डाऊन मुख्य मार्गावर मंगळवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली जामनगर एक्स्प्रेस वेळापत्रकापेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावतील.

प्रवाशांच्या फायद्यासाठी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसला रोहा स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२, १३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. गाडी क्रमांक १२१३४ मंगळूरु ते मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. गाडी क्रमांक २२१२० मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. अशाप्रकारचे वेळापत्रक २८ फेब्रुवारीपर्यंत असेल.

२८ फेब्रुवारीपर्यंत वेळापत्रक विस्कळीत

सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी सध्या १०, ११ फलाटांचे विस्तारीकरण झाले असून १२, १३ फलाटांचे काम सुरू आहे. संपूर्ण पायाभूत कामे नोव्हेंबर २०२४ पूर्ण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले होते. परंतु ही कामे इच्छित वेळेत पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत तर, मंगळूरु एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावतात. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारिरीक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -