द्वारकानाथ संझगिरी हे नाव गेली साडेतीन चार दशके मराठी चित्रपट आणि क्रिकेट रसिकांना सुपरिचित आहे. आपल्या ओघवत्या लेखनशैलीमुळे त्यांनी रसिकांच्या हृदयात एक स्थान निर्माण केले होते.त्यांचे असंख्य चाहते आज दुःखी झाले असतील. त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वृत्तांत वाचनीय असत. त्यांची एक विशिष्ट शैली होती. विनोदाची पखरण करत वृत्तांत लिहिताना अनेक क्रिकेट संदर्भ ते जोडत. मग तो चित्रपटांचा असो किंवा राजकारणाचा. असे संदर्भ देणे, अशा तुलना करणे हा त्यांचा USP होता. या त्यांच्या विलक्षण हातोटीमुळे त्यांचे लेख खुसखुशीत होत असत. लेख वाचायला सुरू केल्यानंतर तो संपवल्याशिवाय कोणीही पेपर बाजूला ठेवत नसे.
आनंद देवधर
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी आज सकाळी कानावर पडली आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाल्याची क्रूर जाणीव झाली. गेली काही वर्षे ते कर्करोगासारख्या असाध्य रोगाशी निकराची झुंज देत होते. ती झुंज आज अपयशी ठरली. संझगिरी यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी… भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मृत्यूची त्यांची तारीख जुळली. काय हा योगायोग. आता इथून पुढे दर वर्षी ६ फेब्रुवारीला लतादीदींबरोबर द्वारकानाथ संझगिरी यांचीही आठवण न चुकता येईल. यांची ओळख काही वेगळ्याने सांगायला नको. शिक्षणाने ते सिव्हिल इंजिनियर. मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत असलेले संझगिरी शेवटी चीफ इंजिनिअर वॉटर वर्क्स म्हणून निवृत्त झाले. मुंबई मनपामधील आपल्या सर्व सहकाऱ्यांशी ते अत्यंत मिळून मिसळून वागत. त्यांच्यात ते खूप लोकप्रिय होते. विविध चॅनेलवर द्वारकानाथ संझगिरी अवतरले की, लोकांना आनंद होत असे. त्यांच्या तोंडून समालोचन आणि विश्लेषण ऐकणे ही एक पर्वणी असे. इतरही अनेक क्षेत्रात त्यांची मुशाफिरी होती. हिंदी चित्रपट आणि चित्रपट संगीत हा त्यांचा दुसरा आवडता प्रांत. दीनानाथमध्ये एकदा किशोर कुमारचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले होते.अत्यंत खुमासदार शैलीत त्यांनी किशोर कुमार रसिकांसमोर उलगडून सादर केला होता. देव आनंद हा त्यांचा वीक पॉईंट. देव आनंदवर एक अप्रतिम दृकश्राव्य कार्यक्रम मी माटुंग्याला यशवंतमध्ये पाहिला होता. त्या कार्यक्रमात संझगिरी यांच्याबरोबर प्रसिद्ध पत्रकार राजू भारतन आणि नंबर वन रेडिओ जॉकी अमीन सायानी हे दोघे हजर होते. या तीन दिग्गजांनी देव आनंदवर केलेला तो कार्यक्रम अविस्मरणीय ठरला होता.
दोन वर्षांपूर्वी दीनानाथमध्येच देव आनंदच्या गाण्यांचा एक कार्यक्रम होता. सूत्रसंचालन करायला द्वारकानाथ संझगिरी होते. थोडेसे कृश आणि अशक्त दिसत असले तरीही देव आनंदच्याच सदाजवान स्टाईलमध्ये केलेले त्यांचे सदाबहार सूत्रसंचालन प्रेक्षकांचे मन जिंकून केले. तब्येतीवर उत्साहाने मात केली होती. एखादा प्रसंग जिवंत करण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यात होती. या कार्यक्रमात त्यांनी एक किस्सा सांगितला होता. देव आनंद आणि गुरुदत्त हे दोघे जिगरी दोस्त. उमेदीच्या काळात काही दिवस ते दोघे पुण्यात राहिले होते आणि गुडलकमध्ये दोघांत एक कप चहा घेऊन आपल्या भविष्याची स्वप्ने बघत असत. हा किस्सा सांगताना संझगिरी इतके समरसून गेले होते, त्यांचे वर्णन इतके चपखल होते की, जणू काही तिसऱ्या खुर्चीत ते स्वतः बसले होते. मी पाहिलेला त्यांचा तो शेवटचा कार्यक्रम. अनेकजण म्हणतात की, त्यांची शैली शिरीष कणेकरांशी मिळती जुळती होती; परंतु तो केवळ योगायोग होता असे मी मानतो. त्यांची शैली खुमासदार, खुसखुशीत, अलगद चिमटे काढणारी तरीही रोखठोक होती.कणेकरांनी चित्रपटावर जास्त लिखाण केले तर संझगिरींनी क्रिकेटवर. अर्थात दोघांच्याही मुशाफिरीचे प्रांत सामायिक होते आणि दोघेही शिवाजी पार्कचेच प्रॉडक्ट होते.
संझगिरी लिहिताना राजकारण्यांच्या उपमा देत. त्यात एक अवखळपणा असे, खट्याळपणा असे आणि त्यांनी केलेली तुलना अचूक असे. कधी कोणाची हलकेच टोपी उडवतील याचा नेम नसे; परंतु ज्याची टोपी उडवली आहे तोही दुखावला जाणार नाही इतकी निर्विष भाषा ते वापरत. माझा फेसबुकवर ओळख झालेला जवळचा मित्र सुनील आकेरकर याने आमच्या दुसऱ्याच भेटीत मला द्वारकानाथ संझगिरी यांचे सबकुछ दादर हा विषय असलेले “पिनाकोलाडा” हे पुस्तक भेट म्हणून दिले होते. जशी कणेकरांची काही वाक्ये लक्षात राहिली तसेच संझगिरींचेही एक वाक्य मी कधीही विसरू शकत नाही आणि हे वाचल्यावर तुम्हीही ते कधी विसरणार नाही. अनिल कुंबळेच्या नावावर सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा भारतीय विक्रम जरी असला तरी त्याचे चेंडू फार वळत नसत. याचे वर्णन करताना संझगिरी एकदा लिहून गेले होते..
“व्यवस्थित पदर घेतलेली सिंधी बाई आणि अनिल कुंबळेचा वळलेला चेंडू सहजपणे नजरेस पडत नाही..” लोकप्रिय क्रीडा पत्रकार, चित्रपट संगीताचा अस्सल दर्दी, वाचकांना गुंतवून ठेवणारा ललित लेखक, खुसखुशीत सूत्रसंचालन करणारा हजरजबाबी निवेदक, त्यांच्या वर्तुळात लोकप्रिय असलेला जीव लावणारा मित्र.. कला, क्रीडा, साहित्य, संगीत अशा क्षेत्रात मनसोक्त वावरलेला, चौकार आणि षटकारांची वाटत टोलेबाजी केलेला एक उमदा मुसाफिर आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या मित्रपरिवारात त्यांना पप्पू असे संबोधले जात असे; परंतु हा पप्पू सर्वांना हवाहवासा वाटणार होता.