Wednesday, September 17, 2025

राष्ट्रपती मुर्मूंनी महाकुंभात केले स्नान

राष्ट्रपती मुर्मूंनी महाकुंभात केले स्नान
प्रयोगराज : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (सोमवार १० फेब्रुवारी २०२५) महाकुंभमेळ्यात येऊन संगमावर स्नान केले. राष्ट्रपतींनी संगमाच्या पवित्र पाण्यात तीन वेळी डुबकी मारली. तसेच सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केले. यानंतर राष्ट्रपतींनी गंगा पूजन आणि आरती केली. स्नानानंतर राष्ट्रपतींनी अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राष्ट्रपतींसोबत राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते.
राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर नियोजीत कार्यक्रमानुसार सकाळी साडेनऊ वाजता बमरौली विमानतळावर उतरले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. तिथून अरैल येथे राष्ट्रपती पोहोचल्या. नंतर बोटीने राष्ट्रपती संगमावर पोहोचल्या. संध्याकाळी चार वाजेपर्यंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमध्ये असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत ज्यांनी महाकुंभात स्नान केले आहे. याआधी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५४ मध्ये कुंभमेळ्यात स्नान केले होते.
कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे होतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे अर्धकुंभमेळा होतो. बारा पूर्ण कुंभमेळे झाल्यावर १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा होत आहे. यामुळे प्रयागराजच्या महाकुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे.
Comments
Add Comment