मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची बदली होण्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरात सुरु असून लवकरच या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली होवून त्याऐवजी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी होणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी २१ मार्च २०२४ रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख असल्याने त्यांची वर्णी महापालिकेत लागली आणि सेवा ज्येष्ठता नसतानाही त्यांच्याकडे प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच डॉ सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यानंतर या रिक्त जागी डॉ विपीन शर्मा यांची वर्णी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी लागली. त्यामुळे त्यांच्याकडे पश्चिम उपनगरे आणि त्याअंतर्गत् आरोग्य विभागाचा पदभार सोपवण्यात आला.
पुलांची उभारणी करताना महानगरपालिका, रेल्वे, पोलीस, ‘बेस्ट’ यांच्यात समन्वय व सुसंवाद राखणार
परंतु हे दोन्ही अधिकारी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील असल्याने त्यांची आता महापालिकेतून उचलबांगडी केली जाण्याची शक्यता असून तशी त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका तसेच मंत्रालयात ऐकायला मिळत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट होत असून त्याअंतर्गत महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची हवा सध्या जोरात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या दोघांच्या बदलीचे आदेश मिळतील असे बोलले जात आहे.