Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यAI Technology : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवकाशात...

AI Technology : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अवकाशात…

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अवकाशात अमेरिका आणि चीनसारखे तगडे देश आधीपासूनच स्थान राखून असताना पुढील सहा महिन्यांमध्ये भारतही त्यात प्रवेश करत असल्याची बातमी महत्त्वपूर्ण म्हणायला हवी. येणारे युग कृत्रिम बुद्धीमत्तेचे असल्याचे एव्हाना सिद्ध झाले आहे. त्यामुळेच भारत उपलब्ध यंत्रणेच्या पायावर या अवकाशातील आपले इमले रचतो की नव्याने पायाभरणी करतो, हे बघावे लागेल.

अतुल कहाते

अमेरिका आणि चीनपाठोपाठ आता भारतही एआयच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवत असल्याची बातमी अनेकार्थाने महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. विशेषत: जगभर ‘डिपसीक’चा बोलबाला असताना भारतीयांनी या बदलाचे महत्त्व आणि होणारे परिणाम जाणून घेणे गरजेचे आहे. अर्थातच त्यासाठी पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता हा घटक सर्वसामान्यांच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. तो त्यांची अनेक कामे सोपी, सुलभ करत असल्याने याची उपयुक्तता आणि आवश्यकता सर्वसामान्यांना समजली आहे. दुसरीकडे, याविषयीची भीतीही बघायला मिळते. अनेकांचे रोजगार जातील का, हा प्रश्नही वारंवार विचारला जातो. मात्र या भीतीपोटी आता चॅटजीपीटीचा वापर थांबणे शक्य नाही. याद्वारे आपल्याला अत्यंत समर्पक उत्तरे मिळतात. केवळ माहितीच नव्हे तर जोडीला व्हीडिओ, ऑडिओ, प्रतिमा हे सगळेही मिळते. चॅटजीपीटीच्या या तंत्रज्ञानामागे लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) नामक तंत्रज्ञान वापरले जाते. यातील तांत्रिकतेकडे न बघता अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर गुगलचे सर्च इंजिन आणि चॅटजीपीटी यातील फरक लक्षात घेता समजते की, सर्च इंजिनवर आपण आवश्यक ती माहिती पुरवण्याची मागणी नमूद करतो आणि त्यानुसार ते संबंधित माहिती पुरवते. मात्र चॅटजीपीटी वापरत असणाऱ्या एलएलएमकडून मिळालेल्या माहितीचे स्वरूप शब्द पुरवलेल्या मजकुराचे नसते, तर माणसाची नैसर्गिक भाषा अर्थात नॅचरल लँग्वेज प्रोसेसग समजून घेण्याची क्षमता या अत्याधुनिक तंत्रज्ञानात असते. म्हणजेच एखाद्या माणसाला समजतो तसा त्याला विचारलेला प्रश्न समजतो आणि तो समजून माणूस उत्तर देईल, तशा प्रकारे आपल्याजवळ असणाऱ्या माहितीच्या ढिगाऱ्यातून बिनचूक माहिती तो समोर मांडतो. एलएलएमला हे महत्त्व असल्यामुळे तंत्रज्ञानातील नवीन टप्पा अर्थात जनरेटिव्ह एआय असे म्हणतात.

नवनिर्मिती करण्याची क्षमता त्याला वेगळे महत्त्व देऊन जाते. थोडक्यात, आपण याला अल्लाउद्दिनचा जादूचा दिवा म्हणू शकतो. असे हे ओपन एआयचे तंत्रज्ञान जगासमोर आणल्यानंतर लोक अक्षरश: चाट पडले होते, कारण आपल्यासमोर असे काही येईल, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे याच धर्तीवर अल्फाबेट कंपनीचे जेमिनी, फेसबुकच्या मेटा कंपनीचे लामा असे तंत्रज्ञान समोर आले. त्यामुळे या क्षेत्रावर अमेरिकेचे मक्तेदार असल्याचे चित्रही स्पष्ट झाले. ते खरेही होते. या तंत्रज्ञानासाठी माहितीचे मोठमोठे ढीग उपसावे लागतात. त्यासाठी संगणकाची प्रचंड मोठी क्षमता वापरावी लागते. सर्वसामान्यपणे संगणकाचे काम चालवण्यासाठी सेंट्रल प्रोसेसग युनिटचा वापर होतो. तो संगणकाचा मेंदू असतो. मात्र एआयमध्ये हा मेंदू पुरेसा ठरत नाही. म्हणूनच त्यासाठी विशिष्ट प्रकारची चीप वापरली जाते. त्याला ग्राफिकल प्रोसेसग युनिट (जीपीयू) असे म्हणतात. हे जीपीयू तयार करणारी अमेरिकेतील ‘एनव्हिडिया’ ही कंपनी असून तिची या कामात मक्तेदारी आहे. या चीपच्या बळावर सगळी कामे वेगाने केली जातात आणि म्हणूनच हे काम फक्त अमेरिकेतच होऊ शकते, असे समजले जात होते.

एआयमधील आपली एकाधिकारशाही टिकवण्यासाठी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने या चीप्सच्या निर्मितीवर मर्यादा घातल्या होत्या आणि चीनला चीप्सची आयात करता येऊ नये, अशा प्रकारचे नियमही आणले होते. मात्र हे सगळे अडथळे पार करून त्यांच्या ‘डिपसीक’ या कंपनीने एका वर्षांच्या आत ओपनएआय, जेमिनी, लामा या सगळ्यांसारखे एलएलएम अत्यल्प खर्चामध्ये उभे करून दाखवले. त्याची क्षमता ओपनएआय वा वर उल्लेख केलेल्या कंपन्यांसारखीच आहे. त्यामुळेच चीनकडून पुढे आणल्या गेलेल्या या तंत्रज्ञानाने जगाला मोठा धक्का बसला. याचे जागतिक परिणामही बघायला मिळाले. अगदी सर्वसामान्य लोकही याचा विनामूल्य वापर करु शकणार असल्याने स्पर्धेला तोंड फुटल्याची भीती व्यक्त केली गेली. कंपन्यांना ओपनएआयचा व्यावसायिक वापर करायचा असेल, तर पैसे भरावे लागतात. मेटाचे ‘लामा’ हे सॉफ्टवेअर मात्र फुकट आहे. त्याला ओपन सोर्स म्हटले जाते. आता डिपसीक कंपनीचे बाजारात आलेले एलएलएमही ओपन सोर्स असणे हादेखील एक मोठा आणि महत्त्वाचा घटक समजला गेला. त्यामुळेच चॅटजीपीटी वा जेमिनी या कंपन्यांना सॉफ्टवेअरमधून मिळणाऱ्या निधीला धोका पोहोचण्याची भीती वाढली आणि जागतिक पातळीवर त्याचे आर्थिक पडसाद बघायला मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याच्या चर्चेप्रमाणे लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) ची निर्मिती भारत नव्याने करणार आहे की त्यासाठी सध्या उपलब्ध असणारे तंत्रज्ञानच वापरणार, याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. आहे ते तंत्रज्ञान वापरून भारत या क्षेत्रात उतरणार असेल तर हे इतके मोठे काम वा महत्त्वपूर्ण बाब वाटणार नाही. मात्र भारत नव्याने हे तंत्रज्ञान विकसित करणार असेल आणि भारताशी संबंधित असणाऱ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होणार असेल तर निश्चितच त्याला खूप जास्त महत्त्व आहे. याकडे दोन अंगांनी बघावे लागेल.

एक म्हणजे याद्वारे भारताशी संबंधित अचूक माहिती मिळेल. जागतिक पातळीवरील लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रकारचे तपशील तितक्याशा मोठ्या प्रमाणात येत नाहीत. तुलना करायची झाल्यास जगाचा ज्ञानकोश आणि भारताचा ज्ञानकोश यात दिसते तसेच अंतर बघायला मिळेल. पण भारत आपल्यासाठी एआय च्या तंत्रज्ञानाची निर्मिती करेल तेव्हा भारताशी संबंधित सर्व छोटे-मोठे तपशील येऊ शकतील. अर्थातच ते स्थानिक व्यापार-उदिमसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर भारतातील कला, संस्कृती, इतिहास अशा बाबींची माहिती तिथे असेल तर सर्व प्रकारचे व्यवसाय, धंदे त्या अानुषंगाने आपला व्यवसाय पुढे नेऊ शकतात. त्या दृष्टीने सॉफ्टवेअर निर्माण करणे वा अशी कामे ते करु शकतात. भारतात येऊ पाहणाऱ्या विदेशी पर्यटकांनी या चॅटजीपीटीला भारताशी संबंधित प्रश्न विचारले, तर अधिक अचूक आणि परिपूर्ण माहिती मिळू शकते. या माध्यमातून ते हवा तेवढा तपशील मिळवू शकतात.

लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये माहितीचे साठे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. पण याच्या जोडीला भारतात स्मॉल लँग्वेज मॉडेल्सही तयार होऊ शकतात. ती त्या त्या व्यवसायासाठी, राज्यासाठी वा अगदी गावासाठीही कामी येऊ शकतात, कारण विविध पातळ्यांवर बनवता येऊ शकतात. याला आपण फोकस लँग्वेज मॉडेलही म्हणू शकतो. पण त्याचबरोबर इथे केवळ फोकस माहितीच नव्हे तर, अन्य प्रकारेही कृत्रीम बुद्धिमत्ता मदत करु शकते. जसे की, हे तंत्रज्ञान विशेष मुलांसाठी कशा प्रकारची चित्रे आणि व्हीडिओ असू शकतात, हे बघून त्यानुसार संशोधन समोर मांडेल. थोडक्यात, अशा प्रकारचे अनेक प्रयोग करण्यास मोठा वाव आहे. स्थानिक पातळीपासून देशाच्या पातळीपर्यंत ते राबवता येऊ शकतात. पण त्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. आवश्यक तेवढा निधी आला पाहिजे. विशेष म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी याचा वापर करुन घेता येतो, यासंबंधीची जाण लोकांमध्ये आली पाहिजे. अशा अंगांनी वापरल्यास हे तंत्रज्ञान लक्षणीय बदल घडवून आणू शकेल. एकदा हे साधले की जागतिक पातळीवरील व्यापारवृद्धीच्या संधी खुल्या होण्यास फारसा वेळ लागणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -