श्रीनिवास बेलसरे
भारतीय चित्रपटसृष्टीला राजेरजवाड्यांचे आणि त्यांच्या भव्य महालात घडलेल्या गुप्त प्रेमकथांचे अनावर आकर्षण पूर्वीपासून होते. त्याचबरोबर राजेशाहीच्या झगमगाटाचा मोहही अनेक दिग्दर्शकांना पडत आला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या लोकांनी सत्ता ताब्यात घेतली त्यांनी विशिष्ट हेतूने लिहून घेतलेल्या इतिहासामुळेही अनेक पिढ्यांना मोगल काळाबद्दल कोणताही विषाद न वाटता उलट काहीसे आकर्षणच वाटत आले. त्यातूनच मोगल काळातील अनेक काल्पनिक दंतकथा आणि काही सत्यकथा हिंदी सिनेमाचे विषय झाले. असेच दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९५३ चा फिल्मीस्तानचा ‘अनारकली’ आणि निर्माते शापूरजी पालनजी यांनी ९ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर काढलेला १९६०चा भव्य ‘मुगले-आझम’. अनारकलीत शहेनशहा सलीमच्या भूमिकेत होते प्रदीपकुमार. नादिरा उर्फ ‘अनारकली’च्या भूमिकेत होती बीना रॉय, जोधाबाईंच्या भूमिकेत होत्या रुबी मायर, तर मानसिंगची भूमिका केली एस. एल. पुरी यांनी. अकबराची भूमिका केली होती मुबारक यांनी. चित्रपटाची पटकथा होती नासीर हुसेन यांची, तर संवादलेखन रमेश सैगल आणि हमीद भट्ट यांचे. दिग्दर्शक होते नंदलाल जैस्वाल.
चित्रपटात एकूण ११ गाणी होती. त्यापैकी ४ तर आजही अनेक रसिकांना तोंडपाठ आहेत. लतादीदींनी गायलेले ‘मुहब्बत ऐसी धडकन हैं, जो समझायी नहीं जाती’, ‘ये जिंदगी उसीकी हैं जो किसीका हो गया, दीदीने हेमंतकुमारबरोबर गायलेले ‘जाग दर्दे इश्क जाग’, हेमंतकुमारचे एकट्याचे ‘जिंदगी प्यारकी दो-चार घडी होती हैं’ रसिकांच्या मनात अजरामर आहेत. अनारकलीची गीते जाँ निसार अख्तरसाहेब, राजेंद्र कृष्ण, हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या चार सिद्धहस्त गीतकारांनी लिहिली होती. रामचंद्र नरहर चितळकर (सी. रामचंद्र) यांनी संगीत दिलेली ही सर्व गाणी लोकप्रिय, तर झालीच शिवाय अनारकली हा त्यावर्षीचा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा चित्रपट ठरला. याच कथेत काही बदल करून आलेला ‘मुगले आझम’ ही १९६० साली बॉक्स ऑफिसवर हीट झाला होता. अनारकली ही एक नर्तिका आणि सलीम, तर मुगल शहजादा! त्यांच्यातले प्रेम सफल होणे अशक्यच! जेव्हा त्यांच्यात अनावर प्रेम फुलते त्यापाठोपाठ घडणाऱ्या प्रसंगात ते सफल होणार नाही हेही स्पष्ट होते. भेटीचे आश्वासन देऊनही सलीम तिला भेटायला येत नाही. उलट राजा मानसिंग पैसे देऊन अनारकलीला शहरातून कायमचे निघून जायला सांगतो. अजूनही सलीम येईल अशी आशा असलेली अनारकली त्याला नकार देते. अत्यंत निराश मन:स्थितीत तिला दरबारात नृत्य करण्यासाठी बोलावणे येते. ती आजारी असल्याचे सांगून जायचे टाळते.
दुसऱ्या नर्तिकेच्या साहाय्याने कार्यक्रम सुरू होतो. पण शेवटी न राहवून अनारकली दरबारात येते. अपराधी आणि अगतिक चेहऱ्याने सलीम तिच्याकडे पाहत असतो. त्यावेळी राजाच्या आज्ञेने पुढील गाणे सुरू होते. राजगायक गातात आणि ती नृत्य करू लागते. कायमची ताटातूट होऊ घातलेल्या त्या दोन प्रेमिकांची तडफड, जीवाची घालमेल त्यांनी केलेल्या त्यावेळच्या मूक अभिनयातूनही व्यक्त होते. सलीमने प्रेमात आपली साथ सोडू नये, त्याने काहीतरी पुढाकार घ्यावा असे दुखावलेल्या अगतिक अनारकलीला वाटत असते. ती त्याला तसे सुचवू इच्छिते. त्याच्या मनातील दबलेल्या प्रेमभावनेला जणू पुन्हा जागृत करण्यासाठीच राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या आणि दीदीने हेमंतकुमारबरोबर गायलेल्या या गाण्याचे शब्द होते-
‘जाग, दर्द-ए-इश्क जाग,
जाग दर्द-इ-इश्क जाग,
दिल को बेकरार कर,
छेडके आंसुओंका राग
जाग, दर्द-ए-
इश्क जाग…’
प्रेमाची हुरुहूर, वेदना वेगळीच असते. ती माणसाला सतत अस्वस्थ ठेवते. ‘त्या भावनेला तुझ्या मनात सतत जागी ठेव तरच आपले प्रेम यशस्वी होईल’ असेच जणू अनारकलीला सुचवायचे आहे. ‘माझ्यासारखे तुही मनाला अस्वस्थ करून घे, हवे तर अश्रूंचा राग गुणगुणत राहा’ असेही ती सलीमला विनवते. राजेंद्र कृष्ण यांनी उर्दू-हिंदी समन्वय साधत हे सगळे गाण्यात उतरवले आहे. अनारकलीला वाटते आपण दोघेही काही काळापूर्वी किती सुंदर स्वप्नात होतो ना! अन क्षणार्धात कसे चित्र पालटले. सगळ्या शक्यता संपल्या. माझे जगच जणू कायमचे झोपी गेले. पण प्रियकरा तू तरी माझ्यासारखा जागा राहशील ना?
‘आँख जरा लगी तेरी,
सारा जहाँ सो गया,
ये जमीं सो गई,
आसमान सो गया,
सो गया प्यार का सुहाग,
जाग दर्द-ए-इश्क जाग…’
ती विचारते माझे दु:ख माझ्या एकटीचेच तर नाही ना? मी ते कुणाला ऐकवणार! प्रियकराने केलेल्या प्रतारणेमुळे मनाला झालेल्या जखमा दाखवू तरी कुणाला? त्यावर कोण फुंकर घालणार? या विरहवेदना उरात घेऊन मी जाऊ तरी कुठे? सगळीकडे अंधार दिसतोय. आशेचा एकही दीप आसमंतात दूरदूरपर्यंत दिसत नाहीये.
किसको सुनाऊँ दास्ता,
‘किसको दिखाऊँ दिलके दाग
जाऊँ कहाँ के दूरतक,
जलता नहीं कोई चिराग,
राख बन चुकी है आग.
दिलको बेकरार कर,
छेडके आंसुओंका राग
जाग, दर्द-ए-इश्क जाग…’
अगदी आतापर्यंत आमच्यातील प्रेम अतूट वाटत होते. पण अचानक परिस्थितीने असे विचित्र वळण घेतले की, सगळे मुळातून बदलून गेले. माझ्या सुखाचे निधान, माझे प्रियतम मला सोडून, उलट माझ्यावरच रुसून कुठे निघून गेले कुणास ठाऊक? त्यांचा अनपेक्षित विरह मला किती दु:ख देतो आहे. जणू एखाद्या नागाने दंश करावा तशा वेदना मी सहन करते आहे.
‘ऐसी चली हवा-ए-गम
ऐसा बदल गया समा,
रूठके मुझसे चल दिए,
मेरी खुशीके कारवाँ,
डस रहे है गमके नाग,
जाग दर्द-ए-इश्क जाग…’
‘तू नही तो और सही, और नही तो और सही’ हेच जगण्याचे तत्त्वज्ञान बनलेल्या आजच्या उचृंखल काळात स्वत:हूनच अश्रूंचा राग छेडून स्वत:च्या मनाला बेचैन कोण करून घेणार म्हणा! पण शाश्वत प्रेमाच्या या अजरामर कथांची हळवी आठवण पुन्हा ताजी करणारी अशी गाणी ऐकणे तर सहज शक्य आहे ना? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!