गुरुनाथ तेंडुलकर
एका शास्त्रज्ञाला मुलाखतीत विचारलं होतं की, तुम्हाला जर परमेश्वर भेटला, तर तुम्ही त्याच्याजवळ काय मागाल? या प्रश्नावर उत्तर देताना तो शास्त्रज्ञ उत्तरला, ‘मला पुन्हा लहान मूल कर, असं मी देवाला सांगेन. कारण, तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुखाचा कालखंड होता.’ आणि खरंच, ‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं जे म्हणतात ते काही खोटं नाही. प्रत्येकाने आपापलं बालपण जरा आठवून पाहावं. कोणत्याही प्रकारच्या चिंता नाहीत, काळजी नाही, ताणतणाव नाहीत, व्यवहारी जगातील व्यावसायिक स्पर्धा नाहीत, हेवेदावे नाहीत, मत्सर नाही, क्लेश नाही की कटकटी नाहीत. सर्व प्रकारचे ताणतणावविरहित चिंतामुक्त जीवन माणसाच्या वाट्याला येतं ते केवळ त्याच्या बालपणीच आणि याच बालवयात सुरू होते विद्यार्थिदशा… ही विद्यार्थिदशा नेमकी केव्हा सुरू होते? मुलं शाळेत जाऊ लागलं की त्याच्याही आधी? माझ्या मते, मुलाची विद्यार्थिदशा सुरू होते ती त्याच्या जन्माबरोबरच, या क्षणी मूल आईच्या उदरातून या विशाल जगात प्रवेश करते तेव्हा… आईच्या उदरातील सुरक्षितता आता संपलेली असते नि जगण्यासाठी त्याला पहिला श्वास घ्यावा लागतो. हा श्वास कसा घेतात याचीही त्याला माहिती नसते. जीव घुसमटतो, घाबराघुबरा होतो, पण त्याही अवस्थेत मूल स्वतःच प्रयत्नपूर्वक श्वास घेतं. श्वासोच्छवासाचं ज्ञान त्याला प्राप्त होतं. पुढे आईचं दूध पिताना, ओठांची हालचाल कशाप्रकारे केली असता दूध मिळतं त्याचं ज्ञान मूल स्वतःच प्राप्त करून घेतं.
पुढे वाढत्या वयाबरोबर माणसांची तोंडओळख, हसणं, रडणं, मान वळवून आवाजाच्या दिशेने पाहणं, उपडी वळणं, रांगणं, दोन पायांवर तोल सावरत उभं राहणं, एक एक पाऊल टाकत चालणं… मूल शिकत असतं. विद्यार्थिदशा ही अशी हळूहळू वेग घेत असते. आपल्या आजूबाजूची माणसं काय बोलतात, कोणती भाषा बोलतात ते नीटपणे ऐकून त्याप्रकारचे शब्द तोंडावाटे उच्चारतानाच मूल बोलायला शिकतं. दिवस जात असतात, काळाचं चक्र फिरत असतं, बाळ वाढत असतं नि वाढत्या वयाबरोबर नवनवीन गोष्टी शिकत असतं. शालेय जीवनाच्या बऱ्याच अगोदर ही विद्यार्थिदशा सुरू झालेली असते.
शाळेत मिळतं ते पुस्तकी शिक्षण… जे या व्यवहारी जगामधे पोट भरण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी आवश्यकच असतं याबद्दल वाद नाही. पण केवळ पोट भरणं, पैसे कमावणं नि सुखाची साधनं विकत घेणं एवढंच मानवी आयुष्याचं ध्येय असतं का? असावं का? केवळ पोटच भरणं ते काय मोठंसं? रस्त्यावरचा बेवारशी कुत्रादेखील पोट भरतो. गटाराच्या पाण्यातील किडे देखील जगतात. मग माणूस नि पशू यात फरक तो काय? एका संस्कृत सुभाषितकाराने म्हटलं आहे :
आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतद पशुभिन्नराणाम् ।
पशू काय करतो? भूक लागली की खातो, झोप आली की झोपतो, जीवावर बेतलं की पळून जातो किंवा प्रतिकार करतो, आणि मैथुन करून वंश वाढवतो. माणूसही हेच करतो; तर मग माणूस नि पशू यामधे फरक तो कोणता? या प्रश्नाचं उत्तर सुभाषितकार पुढच्या ओळीत देतात.
बुद्धेर्हि तेषां अधिको विशेषो बुद्धैर्विहिनाम् पशुभिः समानः ।।
जेव्हा आई-वडील मुलाला तक्ता आणून चित्रांच्या साहाय्याने त्याला अक्षरांची तोंडओळख करून देतात तेव्हा? की त्याच्याही आधी? माणूस आणि पशू यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला मिळालेली विशेष बुद्धी. या बुद्धीचा नीटपणे वापर करून माणूस विचार करू शकतो. आणि केवळ विचारच नाही, तर विवेकपूर्ण विचार करू शकतो. बरं काय नि वाईट काय याचा निर्णय घेऊ शकतो, हितकारक काय आणि अहितकारक काय हे ठरवू शकतो. पण हे हित म्हणजे केवळ स्वतःचंच हित नव्हे बरं का. स्वतःचं हित तर साधायला हवंच, पण स्वतःचं भलं करताना दुसऱ्याचंही भलं करता यावं, किमान त्याचं निदान नुकसान तरी होणार नाही याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. स्वतःबरोबर समाजाचंही उन्नयन कसं करता येईल याकडेही लक्ष असणं आवश्यक आहे आणि हे उन्नयन करण्याचं मार्गदर्शन ज्याच्यामुळे मिळतं ते खरं शिक्षण… शिक्षण म्हणजे केवळ शाळा-कॉलेजात जाऊन, चार दिवस परीक्षा देऊन आणि एक-दोन कागदी सर्टिफिकेट मिळवून संपादन करण्याचा विषयच नव्हे. शिक्षण म्हणजे परिपूर्ण जीवन जगण्याची कला. शिक्षण म्हणजे आपल्यासोबत इतरांनाही उन्नतीच्या मार्गावर नेणं. शिक्षण म्हणजे प्रगल्भ होण्यासाठी आवश्यक ती ज्ञानसाधना.
अशा प्रकारचं शिक्षण मिळविण्याचा, समाजाची उन्नती करीत आत्मोन्नत होण्याचं ज्ञान संपादन करण्याचा काल हा केवळ बालपणापुरता मर्यादित न ठेवता आयुष्यभराएवढा व्यापक केला तर…? ज्ञान संपादनाची ही प्रक्रिया केवळ शालेय नि महाविद्यालयीन शिक्षणापुरती मर्यादित न ठेवता पुढेही जीवनभर सुरू ठेवली तर? तर ज्ञान संपादनाचा हा विशाल कालखंड म्हणजे आयुष्यभरासाठी पत्करलेली विद्यार्थिदशाच असेल, आणि सुरुवातीसच उल्लेखिल्याप्रमाणे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक बालपणाप्रमाणेच सुखाचा कालखंड आहे याचा प्रत्यक्ष अनुभव येईल.