Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाजValentine : बहरले प्रेमाचे वारे

Valentine : बहरले प्रेमाचे वारे

प्राची शिरकर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ पण नेमकं काय असतं? गोड, गुलाबी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी हा एक हक्काचा दिवस! प्रेम म्हणजे… एक नाजूक, निष्पाप, तरल आणि नैसर्गिक भावना. विशेषतः सोळावं वरीस धोक्याचं या उक्तीनुसार शालेय महाविद्यालयीन जीवनात प्रेम होणे, प्रेमात पडणे, प्रेमात वेडं होणे, साथ जियेंगे साथ मरेंगे अशा शपथा घेणे अतिशय स्वाभाविक आहे. या अवखळ आणि नाजूक वयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे, ओढ वाटणे, एखाद्यावर आपला जीव ओवाळून टाकायची भावना निर्माण होणे, सातत्याने गोड सुखद स्वप्नात रमणे, स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करीत, शाश्वत आणि व्यावहारिक जीवनाचा विसर पडून आपल्या प्रेमाला विरोध करणारे आपले कुटुंबीय आणि हा समाज आपला दुश्मन आहे असे वाटणे स्वाभाविक असते. फेब्रुवारी महिना येतोच मुळी प्रेमाच्या आगमनाची दवंडी देत. आजही व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो आणि त्यामागे स्वतःची परंपरा आहे. व्हॅलेंटाईन डे हा खऱ्या उत्कटतेचा, सहवासाचा आणि कौतुकाचा वार्षिक उत्सव आहे. लोक हा दिवस दरवर्षी ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पार्टनर्स, नातेवाईक आणि मित्रांना प्रेम संदेश पाठवून साजरा करतात. असंच काहीसं तरुणाईचं प्रेम, प्रेमात आकर्षण ते म्हातारपणातलं प्रेम काय आहे हे या लेखातून जाणून घेऊया…

तरुणाईचं प्रेम

‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमात असणाऱ्या तरुण-तरुणींचा उत्सव. जोडप्यांसाठी असलेल्या या दिवसाची व्याख्या बदलली आहे. व्हॅलेंटाईन डे अर्थात ‘प्रेमाचा दिवस’ आठवडाभर साजरा होऊ लागला आहे. ‘रोज डे’ पासून व्हॅलेंटाईन डे वीकला सुरुवात झाली आहे. प्रेम ही खरे तर मनातील हळुवार भावना. प्रेम म्हणजे शेवटी काय असतं हो? आपुलकीच ना? आपण केवळ तरुण वयातच प्रेम करतो असं नाही. प्रेम ही भावना निसर्गदत्त आहे. प्रेमाची समज, त्याचे आविष्कार, प्रेमातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आजच्या पिढीकडे जास्त आहे. युवक-युवतींमध्ये १४ फेब्रुवारी या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हावं, यासाठी धडपडणाऱ्यांना आतापर्यंत मूक असलेल्या या अनोख्या तारुण्यसुलभ भावनेला व्यासपीठ मिळतं ते या दिवसाच्या रूपाने! ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटले की, तरुणाईत उत्सवाचे वातावरण असते. आजची तरुणाई बिनधास्तपणे म्हणू लागली आहे. प्रेम करणे वाईट नाही, म्हणून बेधडकपणे स्वत:च्या भावना व्यक्त करण्याकडे तरुणाईचा कल असतो. प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नसून आयुष्यभर सुख-दु:खात सोबत राहण्याची कमिटमेंट आहे, हे आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. पूर्वी केवळ एक दिवस साजरा होणारा हा दिवस आताची पिढी आठवडाभर साजरा करताना दिसते. त्यामुळे या निमित्ताने गिफ्टिंग मार्केटचे विश्व तेजीत असते. या दिवशी लोक त्यांच्या प्रियकर-प्रेयसी किंवा जोडीदाराला सुंदर भेटवस्तू आणि संदेश पाठवतात. मुंबईतील बहुतांश गिफ्ट शॅाप हे लाल रंगाने सजले आहेत. व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास असतो. बहुतांशी जोडपी हा संपूर्ण आठवडा एका खास पद्धतीने साजरा करतात. एकमेकांना भेटवस्तू देऊन, प्रेम व्यक्त करतात. याला वयाचे कोणतेच बंधन नाही. अगदी हळूवार वयातील प्रेमापासून ते विवाहीत जोडप्यांपर्यंत आणि वृद्धापकाळात आपल्या साथीदाराच्या सहवासातही हे प्रेमाचे दिवस साजरे करतात.

प्रेम आणि आकर्षण

प्रेमात पडलं की व्यक्ती आजूबाजूच्या गोष्टी विसरतो असं म्हणतात…प्रेमात पडायला कोणाला आवडत नाही…मुळात एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, आपली काळजी घेते ही भावनाच संबंधित व्यक्तीसाठी महत्त्वाची असते. प्रेम कधी होते हे अनेकांना कळत नाही. आजकाल लोक म्हणतात पहिल्या नजरेत प्रेम होतं… पण हे खरंच शक्य आहे का? आजच्या तरुणाईला प्रेम आणि आकर्षण यातील फरकच समजत नाही. त्यांना असे वाटते की, कोणीतरी पहिल्यांदा पाहिल्यावर प्रेमात पडते. मी तुझ्यावर प्रेम करतो म्हटल्याने तुझ्या प्रेमात पडते. खरे तर ‘प्रेम आणि मोह’ यात खूप फरक आहे. कधी-कधी तुमचे आकर्षण काही दिवसच टिकते. जर तुम्ही त्या व्यक्तीला नीट ओळखतही नसाल, तर तुम्ही व्यक्तीवर प्रेम करता हे कसे शक्य आहे? हे फक्त एक आकर्षण असू शकते. जे सुरुवातीला प्रेमासारख्या भावनेने घडते. पण प्रेम आणि आकर्षण कसे ओळखावे हा यक्ष प्रश्न समोर उभा राहतो.​ पहिल्या नजरेत आपण केवळ समोरच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो, जे बहुतेक केवळ दिसण्यावर आधारित असते. भविष्यात त्यांच्या लूकमध्ये किंवा सौंदर्यात बदल झाला, तर तुमचे त्यांच्यावरील प्रेमही संपुष्टात येऊ शकते, असेही म्हणता येईल. प्रेमात अंतर महत्त्वाचं नसतं, जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल आणि आकर्षण नसेल तर दोघांच्याही नात्यातील अंतरात फरक पडत नाही.

आजी-आजोबांचं प्रेम

आजही आजोबांना आजीच्याचं हातचा चहा लागतो तर, आजही आजी दारात उभी राहून वाट पाहते ती आजोबांनी आणलेल्या एका गजऱ्याची… हेच ते खरं प्रेम! खरं तर आधीच्या काळात प्रेम, लग्न या सर्व गोष्टी नसायच्या. मात्र आज ज्या आजी- आजोबांच्या जोडप्यांची प्रेम कहाणी असते ती पाहण्यास आणि ऐकण्यास एक वेगळाच आनंद मिळतो. त्यावेळी तुमची प्रेम कहाणी कशी होती? एवढी वर्षे तुम्ही कसं राहिलात? व्हेलेंटाइन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रेम काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यासाठी प्रेम काय आहे? असे सर्व प्रश्न आपल्या तरुणाईमध्ये, तर नक्कीच उपस्थित असतात. आज रस्त्याने जाताना सुद्धा आपण बघत असतो की, आजी-आजोबाचं जोडपं एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन एकमेकांचा आधार घेऊन रस्त्याने चालले आहेत. वृद्ध लोकांबद्दल आपल्याला वाटत असलेला आदर असूनही, लोक प्रेमात आणि एकत्र कसे वृद्ध होतात किंवा ते त्यांच्या सभोवतालच्या बदलत्या जगाशी कसे जुळवून घेतात याबद्दल आपल्याकडे फारशा कथा नाहीत. आपल्या प्रेमकथा, नल आणि दमयंती, सावित्री आणि सत्यवान, राम आणि सीता, सर्व तरुणांबद्दल आहेत, त्यांच्या पहिल्या गुलाबी फुलात प्रेम, पहिल्या नाजूक बहरात त्यांचा प्रणय. या सत्तरी वर्षांच्या जोडप्यांचं इतक्या वर्षात असलेले अद्भुत नातं, केमेस्ट्री, नव्याने प्रेमात पडलेल्या जोडप्यांसारखी आजही ताजी दिसते!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -