पूनम राणे
व्यक्तीच्या जडणघडणीत अनेकांचा सहभाग असतो. मात्र हा सहभाग मानव आणि मूल्यांची प्रतिष्ठापना करणारा असेल, माणसाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असेल, तर व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होण्यास मदत होते. अशाच एका परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाची आजची ही कथा. “आज मी येथे सभागृहात येताना रिक्षाने आलो, पण इथे आल्यावर मला वाटलं , खरं म्हणजे रिक्षाने मला अंतरिक्षातच आणून सोडलं!” अशा अर्थगर्भ, आणि लक्षवेधी छटांनी भाषणाची सुरुवात करून सभागृहातील रसिकांची दाद मिळविणारे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांचे श्रद्धास्थान त्यांचे वडील होते. समज प्राप्त झाल्यापासूनच त्यांच्या कानावर शब्द पडले ते वडिलांचेच. ते आदर्श शिक्षक आणि प्रभावी वक्ते होते. त्यांचं शुद्ध बोलणं, मराठी भाषेवरील प्रभुत्व, वाचणे, ऐकणे, विचार करणे या सर्वांचा परिणाम शिवाजीराव भोसले यांच्यावर झाला.
स्वातंत्र्याच्या क्रांती पर्वात शाळेचे वर्ग चालत नव्हते. काय करावे? म्हणून सर आश्रय स्थान शोधत होते. मग किल्ल्यावर ते फिरायला जायचे. त्यावेळी नगरवाचनालय त्यांच्या दृष्टीस पडले. या नगर वाचनालयात विवेकानंदांची एका रांगेत लावलेली पुस्तके त्यांनी पाहिली. त्यातील राजयोग नावाच्या पुस्तकाचा त्यांना स्पर्श झाला. पुस्तकातील विचार, अनुभवशास्त्र त्यांच्या मनात खोलवर रुजले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शाहू बोर्डिंगमध्ये त्यांचे शिक्षण सुरू झाले. “कमवा आणि शिका” हे तेथील तत्त्व होते. विद्यार्थ्यांनी झोपडीत राहायचं, स्वतःच झोपडीचे बांधकाम करायचे, छप्पर घालायचे तसेच स्वतःची भूक स्वतःच्या प्रयत्नाने भागवायची. अर्थात जगण्याला आवश्यक असणाऱ्या क्रियांचे जीवन शिक्षण त्यांना तिथे मिळाले. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असूनही त्यांचा ओढा कला शाखेकडे होता. त्यांना प्रामुख्याने मानसशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांची अत्यंत आवड होती. ना. सी. फडके, श्री. म. माटे, प्राचार्य सोनोपंत दांडेकर, पू. ग. सहस्त्रबुद्धे यांसारख्या नामवंत प्राध्यापकांच्या सहवासामुळे त्यांच्या कर्तृत्व वेलीला बहर आला होता. त्याचप्रमाणे अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे विद्यार्थीदशेत ऐकली होती.
फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये तर्कशास्त्र, मानसशास्त्र विषय शिकवत असताना अतिशय कठीण विषय सोपा करून शिकवणे ही प्राचार्यांची हातोटी होती. केवळ वाचून शिकवणं त्यांना कधीच जमलं नाही. ते शिकवत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचं, सरांचा तास केव्हाच संपू नये. तासनतास त्यांनी बोलावं आणि आपण श्रवण समाधी अनुभवावी! त्यांच्या तासाला जणू काही मैफल रंगत असे. “विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान, ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ माणसांचे विचार ऐकले पाहिजेत. त्यामुळे चांगला युवक तयार होईल, चांगले व्यक्तिमत्त्व तयार होईल,” अशी त्यांची धारणा होती. प्राचार्यांनी आपल्या जीवनात सातत्य, विनम्रता आणि वक्तशीरपणा ही महत्त्वाची सूत्र अंगी बाणली होती. वाग्यदेवतेच्या प्रसन्नतेमुळे त्याचप्रमाणे वाचनातून आलेले भाषेवरील प्रभुत्व, अचूकपणा, विषयाची सखोल मांडणी, सजगता, रसाळ भाषाशैली, वाणीला लाभलेला नाद, लय कुठेही न अडखळता बोलण्याची पद्धत रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती.
त्यांचे ‘कथा वक्तृत्वाची’ हे पुस्तक जरूर वाचावे. त्या पुस्तकात ते लिहितात, ‘‘शिक्षकांच्या बोलण्यातून विद्यार्थ्याला त्यांच्या बुद्धीचं खाद्य मिळणार असतं. म्हणून शिक्षकांचं बोलणं असं असावं,” ज्याप्रमाणे माणसं उन्हानं त्रासलेली असावीत. आकाश काळ्याभोर ढगांनी भरून यावं, विजांचा कडकडाट न होता हळुवार सरी पृथ्वीवर पडाव्यात, आणि मातीच्या सुगंधात विद्यार्थ्यांची मने मोहरून जावीत. तसं आपलं बोलणं पावसाच्या हळुवार सरीप्रमाणे असावं. हलक्या सरी जमिनीत मुरतात, म्हणून बोलणं हळुवार, नम्र असावं. स्पष्ट उच्चार आणि विनम्र वाणी असावी.” प्राचार्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून लेखन केलं. विद्यार्थी प्रिय प्राचार्यांना अनेक मानसन्मान लाभले. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे सत्कार झाले. मात्र त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांची केलेली ग्रंथतुला हा फार मोठा सन्मान प्राचार्यांचा होता. त्यांच्या शब्दांची शक्ती आणि व्यक्तिमत्त्वाची उत्तुंगता आपण आपल्या वर्तनक्रमांत अंगीकारली, तर आपलेही व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होऊ शकेल.