राजश्री वटे
हा जो ‘वेगळा’ शब्द आहे ना… बरंच काही सांगून जातो! सगळ्यांचं आहे तसं नसणं… त्यापेक्षा हटके म्हणजे ‘वेगळं’ !!
हे वेगळेपण कुठलंही असो… लगेच लक्षात येणारी गोष्ट आहे… स्त्रीमधील दिसणं असो, वागणं असो, टापटीपपणा असो, सुगरणपणा, स्टाईलिश असणं, शिष्टपणा असो… हेअरस्टाईलपासून साडी, राहणीमान, वागणं, बोलणं, मिरवणं असं अनेक तिच्यातलं बरंच काही वेगळेपण सांगणारे गुण… जे इतरांमध्ये नाही, पण एखादीतच आहे हे वेगळेपण… लक्ष वेधून घेणारं… तिचं देखणं सौंदर्यदेखील इतर जणींपेक्षा उठून दिसणारं असेल, तर लगेच तिच्यावर तिच्या वेगळं असण्याचा ठप्पा लागणार व तो ती मिरवणार… पुरुषांच्या बाबतीतही कर्तृत्व, राहणीमान, बोलणं त्यातील लकबी, वागणूक व अनेक गुण जे बाकींच्यामध्ये नाहीत, पण त्याच्यात आहे… हे वेगळेपण लक्ष वेधून घेतं!
हे झालं बाह्यरूप; परंतु अंतर्गत रूपाचं वेगळेपणही असतं… कला… कोणतीही असो, धाडसीपणा, वेगवेगळ्या क्षेत्रातील जबाबदारी निडरपणे निभावणं हे त्या व्यक्तिमधील वेगळेपणाची दखल नक्कीच घेतं… प्रत्येक व्यक्तीला आपण काहीतरी वेगळं करावं, वेगळ्या वाटेनं जावं अशी इच्छा असते, काहीजण त्यात यशस्वी होऊन आपलं वेगळेपण सिद्ध करून दाखवतात… कल्पना चावला एखादीच होते, पाय नसताना एव्हरेस्ट सर करणारी अरुणीमा एखादीच असते… अशा वेगळ्या असणाऱ्या लोकांची, तर मोठी यादीच आहे जी कायम लक्षात राहणारी… यांच्या वेगळेपणाने इतिहास रचला आहे!!
ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारे… अवर्णीय! “असा का मी वेगळा… वेगळा’’ ‘चौकट राजा’ या मराठी सिनेमातील गाणं आठवतं का हो… पाहताना तर येतंच पण नुसतं कानावर पडलं तरी डोळ्यांत पाणी आणतं त्याचं वेगळेपण…! त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना आवडणाऱ्या व झेपणाऱ्या क्षेत्रात पुढे जातात व सर्वांपासून वेगळे असून सर्वांची मने जिंकून घेण्याची कामगिरी करतात… अशा वेगळ्या मुलांचे पालक सर्वांपेक्षा वेगळं आयुष्य जगत असतात… त्यांच्या पाल्याचं यश त्यांच्या एका डोळ्यात आसू, तर दुसऱ्या डोळ्यात हसू आणतं… अपार मेहनत असते या वेगळेपणामागे! शरीराने कुठल्याही प्रकारच्या वेगळेपणावर मात करण्याची जिद्द सर्वांना अवाक करून सोडते… या सर्वांना कडक ‘सॅल्यूट’… नतमस्तक!!
मनुष्य जीवनाची प्रत्येक क्रिया… बाह्यरूपापासून अंतर्गत गुणांपर्यंत वेगळी असते. आणि प्रत्येकाच्या वेगळेपणातून एखादंच लक्षवेधक ठरतं!!
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये शोधलं तर वेगळेपण असतंच… कुठलीही गोष्ट सारखी नसते… मोरासारखा देखणा पक्षी आहे का हो कोणता… वाघासारखा रुबाब कोणत्या प्राण्यात दिसतो… फुलांचा राजा गुलाब… प्रेमात अग्रेसर ठरतं ते त्याचा वेगळ्या सौंदर्यामुळे! असं वेगळेपण अगणित आहे. फक्त ‘वेगळी’ नजर असावी लागते ! “ हे वेगळेपण भारी देवा’’!