रमेश तांबे
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. त्याचे राज्य खूप मोठे होते. धनधान्याने समृद्ध होते. लोक आनंदी होते. समाधानी होते. पण एकच सल राजाला होती, ती म्हणजे हे राज्य पुढे कोण चालवणार? कारण राजाला मुलगा नव्हता. राजाचे वयही वाढत चालले होते. त्यामुळे राज्याचा वारसदार कोण? नवा राजा कोण होणार! याच्या शोधात राजा होता. आपल्या मंत्रिमंडळातले सरदार, प्रधान, सेनापती यांपैकी राजाला कोणीच नवा राजा या पदासाठी योग्य वाटत नव्हते. खरे तर ही सारी मंडळी आपापल्या क्षेत्रात उत्तम होती, प्रख्यात होती. पण राजा बनण्यासाठी विचारांचा चौफेर आवाका असायला हवा तो त्यांच्यात नव्हता. त्यामुळे आता जनतेमधलाच कोणीतरी तरुण जो धाडसी आहे, कनवाळू आहे, हुशार बुद्धिवान आहे, आपल्या प्रजेची काळजी घेणारा आहे त्यालाच आपण आपला वारसदार नेमू या असे म्हणून राजा कामाला लागला. राजा आपल्या राजवाड्यातील एका विश्वासू सेवकाबरोबर वेश बदलून राज्यात फिरू लागला. रोज चार तास ते दोघे नव्या राजाच्या शोधात बाहेर पडत होते. ते पाहायचे अनेक तरुण मुले, पण तब्येतीने अगदीच किरकोळ. कोणी बुटके तर कोणी खूपच उंच बांबूच्या काठीसारखे! कोणाच्या चेहऱ्यावर तेजच नाही तर कोणाची तोंडे तंबाखू,पानाने सतत बरबटलेली. कोणाची भाषा अगदीच खालच्या पातळीची तर कोणी नुसताच अभ्यासू, कोणी छान शरीर कमावलेला पण डोक्यात बुद्धीचा लवलेश नसलेला! राजा आणि सेवक रोज फिरून फिरून दमून गेले. पण त्यांना मनासारखा
तरुण सापडेना!
शेवटचा प्रयत्न म्हणून ते दोघे शहरापासून दूरवर असलेल्या खेड्याच्या दिशेने निघाले. हिरवेगार डोंगर, पाण्याने भरलेल्या नद्या, हिरवीगार शेती, शेतात उभी असलेली टुमदार घरे हे दृश्य पाहून राजा सुखावला. या अतिसुंदर निसर्गरम्य वातावरणात कुणी तरुण आपल्याला सापडला तर किती बरे होईल! राजा मनातल्या मनात विचार करीत होता. आता ते दोघे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले. इकडे तिकडे बघता बघता त्यांना एक पंचवीशीतला तरणाबांड मुलगा झाडाखाली काही वाचत बसलेला दिसला. त्याची गाई गुरं समोर चरत होती. वाचता वाचता तो मध्येच गोड आवाजात गाणं गुणगुणत होता. तो खूप आनंदी आणि उत्साही दिसत होता. त्याचा चेहरा अगदी टवटवीत आणि तेजस्वी वाटत होता. त्याच्याकडे पाहून राजाचे मन उल्हासित झाले.
तितक्यात त्याची गुरे सैरावैरा धावू लागली. तो जागेवरून उठला. बघतो तर काय समोर वाघ एका गाईच्या मागे लागलाय! त्याने एका झटक्यात हातातले पुस्तक बाजूला ठेवले. शेजारीच ठेवलेली आपली काठी उचलली आणि तीरासारखा वाघाच्या दिशेने धावत सुटला. तोपर्यंत वाघाने गाईचा मागचा पाय पकडला होता. तो तरुण धावतच वाघाजवळ पोहोचला आणि वाघाच्या पाठीवर काठीने वार करू लागला. तरी वाघ गाईचा पाय सोडत नव्हता. शेवटी त्या तरुणाने वाघावरच झेप घेतली. आता मात्र वाघ घाबरला आणि त्याने गाईचा पाय सोडला अन् आपला मोर्चा तरुणाकडे वळवला. पण तो तरुणही शरीर कमावलेला होता. दोन-चार झटापटीतच त्यांने वाघाला लोळवले. त्याच्या हाताच्या पकडीतून कशीबशी सुटका करून घेत वाघाने तेथून पळ काढला.
या झटापटीत त्याच्याही हाता-पायाला वाघाची नखे लागली होती. मग तो घराकडे गेला. औषधं, पाण्याची बाटली आणि कपडा घेऊन आला. त्याने गाईची जखम धुतली. औषधं लावून ती फडक्याने बांधून टाकली. मग तेच औषध त्याने स्वतःच्या जखमेवरही लावले. राजा त्या तरुणाचे धाडस बघून खूपच प्रभावित झाला होता. शिवाय दया, करुणा, कनवाळूपणा या गुणांचे दर्शनही राजाला त्याच्या स्वभावात दिसले. त्याला पुस्तके वाचायला आवडतात, तो धाडसी आहे, कनवाळू आहे, काळजी घेणारा आहे. राजाला लागणारे सर्व गुण त्या तरुणात राजाला दिसले आणि म्हणूनच आपला वारसदार, नवा राजा म्हणून त्या तरुणाचा विचार राजाने मनात पक्का केला आणि मोठ्या आनंदाने, समाधानाने राजा राजवाड्यात परतला.