माेरपीस – पूजा काळे
माझं पत्र वाचून त्वरेने येण्याचं कळवताचं, प्रकृतीत वासंतिक उत्सवाचे वारे वाहू लागलेत. गुलाबी हवेच्या धुंदीला जोर येऊ लागलाय. अंगाखांद्यावर निसर्गाला खेळवत येणाऱ्या, वसंताच्या खुणा जागोजागी दिसू लागल्या की, ऋतूला लागलेले डोहाळे, तिच्या सृजनाच्या वेळा, फुलांच्या रंगीत ताफ्यातले गंध झेलीत माहेराला येतात. मनमोहक सडा रांगोळीत सजलेली अवनी, नवी नवेली नवरी दिसू लागते. मिले सूर मेरा तुम्हारा म्हणतं, आपणही सोहळ्याचा भाग होतो. विविध रंगाच्या, सुवासिक फुलांतला ऋतू मिलनाचा उत्सव मोठ्यांपासून लहानांपर्यंत, नवदाम्पत्यांपासून प्रेमात पडलेल्यांना भारावून टाकतो. कोकिळ धून ऐकताना, तान छेडित येणारे प्रेमदिवस मनाला भुरळ घालतात. प्रेम सनावाची गोष्टचं भारी आहे. प्रेम करावं, प्रेमात पडावं या स्थितीत आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभला तर आस्मान ठेंगणं होईल. यास्तव प्रेमासाठी आतूर जगातली कुठलीही सुंदर फुलं देठापासून मनमौजी करायला तयार होतील.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनचं जाणवू लागलेला हवेतला बदल, बोचऱ्या शीतलहरी रोमांच उभे करतात अंगावर. त्याचवेळी आठवणींच्या पसाऱ्यातली एक खोल हृद्र आठवण हलकेचं वर येते. विचारांचं वादळ, दृष्ट आठवांचा मेळा, गच्च मिठीतली अनाहत भेट, अहाऽहा… तुझ्यासोबत घालवलेले बारमाही ऋतू संसाराचा पट उलगडतात, तेव्हा अमिताभची गाणी आठवून, आवडू लागतात. तुम होते तो ऐसा होता, तुम होते तो ऐसा होता. त्यावेळच्या त्याच्या बऱ्याचशा चित्रपटाची दिवानी होते. नयनरम्य गुलाब बागा, बर्फाच्छादित प्रदेशावर आधारित गाण्यांचा सिलसिला अहाऽहा… यावर आपल्या भेटीदाखल तू दिलेला लाल-गुलाबी गुलाबांचा बुके. सात दिन का साथ म्हणत प्रेमाच्या सात वैशिष्टपूर्ण गुलाबी विश्वातलं तुझं माझं आणि गुलाबांच राज्य कसं विसरेन मी. मला पाहताच माझं नामकरण गुलाबो करून टाकल होतस. आणि त्यावर तुला सुचलेली हिंदी कविता म्हणजे माझा आनंद गगनात मावत नव्हता…
“सुबह के महके हूए ख्वाबों के साथ,
मेरी सांसों में तुम्हारी सांसों की
धीमी खुशबू समाने के बाद,
इत्र भी बेअसर हो गया…
गुलाबो, तुम्हारी उसी खूशबू में
पता ही नहीं चला तुम्हारे जाने का…
जब आँख खुली,
तो पाया, खाली कमरा, खाली घर, और टुटा हुआ दिल…
अब दिन ढलते ही, गुलाबो तेरी याद दिला देता है,
उन्ही हसीन दिनों की तरह,
हर लम्हा जो दिल को जगमगाता है…
उस रोशनी से चमक ऊठती हैं,
ऐसे ही कुछ और सपनों भरी दुनिया.
जिन सपनों से कायनात मुकम्मल है…
वैसे ही…गुलाबो आज मन के कोरे कागज पर,
लिखे है कुछ गुलाबी लफ्ज…
जिन लफ्जो में सिर्फ तुम बसी हो…
कुछ सूर, कुछ आरोह, अवरोह… और उन में सजा प्रेमगीत…
जिसमे लिखा है खामोश अफसाना
पर शोर के इस अंतराल में,
कौन सुनता है खामोशी की सदा…! कौन सुनता हैं खामोशी की सदा….!
निस्सीम भक्तीने देवाला वाहिलेल्या फुलातं जर भक्तिभाव असतो तर प्रेमाने दिलेल्या गुलाबांमध्ये प्रेमभाव असायलाचं हवा, हा… हा… तुझा वात्रटपणा, तुझ्या या…या असल्या फिलॉसॉफीकल प्रेमशास्त्राच्या प्रेमात पडले मी. व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने तू, मी आणि या गुलाबांची आठवण आजही ताजी आहे, जी आपल्या प्रेम कहाणीची सुरुवात आहे.
श्रद्धा, प्रेम, समर्पणाचं प्रतीक असलेल्या गुलाबांची तुला भारीचं हौस होती…! लाल, मिश्रगुलाबी, पिवळा अन् पांढरा, न चुकता आणलेला कळीदार गुच्छ पाहून वरवर नाराजी जरी दाखवली, तरी आतून माझ्या मनाचं पिंपळपान खूश होई. ‘ही गुलाबी हवा वेड लावी जीवा’ अवस्थेपर्यंत, अय्यौऽ माझ्यासाठी एव…ढा ऽऽ मोठा फुलांचा बुके. बाई ग्ं.! केवढं हे प्रेम! हुरळून जाणार नाहीतर काय मी.! मग मैत्रिणींनाही मस्करीचा ऊत येई. विविध छटेतल्या गुलाबाच्या रंगाचा टवटवीतपणा चेहऱ्यावर आपसूक येई. आपल्या नजर भेटीतल्या पहिल्या वहिल्या गुलाबापासून, लग्नात वधूवरांनी घातलेला पाकळ्यांचा हार, ते आजचं यशस्वी सहजीवन गुलाबात सामावलयं. साथ देत आलाय हा गुलाब. फुलांचा राजा असला, तरी हृदयावर अधिराज्य गाजवावे ते यानेचं. म्हणूनचं की काय, वय वाढलं, नाती वृद्धिंगत झाली, इच्छांना पूर्णत्व आलं, तरी एक गुलाब तुझ्यासाठी कायमचं जपत आलेय माझ्या मनात. याच्या कोमल दलाचा रंग उतरतो वहीच्या पानात. अजूनही कोपरा न् कोपरा दरवळतो स्नेहाचा. सदैव उतरवित रंग प्रेमाचा. आठवणीत साठलेल्या जुन्या गोष्टी चंदनासारख्या गंध पसरवत येतात. एक वर्षी व्हॅलेंटाईन डे ला तू चारोळी करून माझं उरलं सुरलेलं प्रेम जिंकलं होतसं. काही आठवतयं का? तू म्हणत होतास की,
तिची माया आभाळाशी,
बोलता बोलता संवाद साधते ती,
सहज दुसऱ्यांशी.
त्यावर मित्रांनी माझा मोठेपणा समजावतं तुला चार ओळी सुचवल्या होत्या…
वेडा आहेस, जाणलं नाहीस तू स्वत:शी.
दोनशब्द बोलण्यासाठी, घालव संध्याकाळ तू जराशी तुझं गुलाबाच्या लाल रंगासारख गहिर प्रेम पाहताच लाजत, मुरडत का होईना माझ्याही त्यावर प्रतिक्रिया होत्या.
बंदिस्त कुपीतून येतो,
जसा सुगंधित परीमळ
तव कुशीत मज मिळावा
जणू प्रेमानंद निर्मळ.
अलवार यावे जवळ,
केसावरूनी फिरवावा हात.
मग आपुल्या गुजगोष्टींनी,
बघ रात्रही टाकेल कात.
ओठावर नाव तुझे रे,
मी सांगून जाते काही.
डोळ्यांत पाहूनी तुझिया,
मी बोलून जाते काही.
मी नको नको म्हणताना,
तू हात धरितो कान्हा.
एकांत पुरव जरासा,
मी येईन पुन्हा पुन्हा.
तू हसूनी टाळून देतो,
पाशात अलिंगनाच्या.
श्वासाचे भार सहाते
त्या रात्री मिलनाच्या.
मायावी गुलाबी थंडीच्या,
गालाशी मादक खुणा.
फिरूनी तुझी याद येता,
तू जवळी हवा साजणा.
आजूबाजूला गुलाबी वारे घोंघावत असताना, मनात उठलेल्या कारंज्यांना आवरणं कठीण आहे. माझ्याकडच्या बकेट लिस्ट मधल्या यादीत एका नव्या गुलाबाची भर पडेल. संध्याकाळपासूनचं तुझ्या वाटेवर डोळे लावून बसली आहे तुझी गुलाबो.