मुंबईतील नाटक

मायभाषा - डॉ. वीणा सानेकर


सोमैया विद्यापीठातील स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजच्या एका परिषदेत नाटकाच्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाचा शोध घेण्यात आला. ‘नाटक समाजाचे सत्य धाडसाने सांगत आले आहे. एका अर्थी नाटक समाजाचा ‘कार्डीओग्राम’ काढत असते.’ या शब्दांत डॉ. गणेश देवी यांनी त्यांच्या बीजभाषणातून नाटकाचे महत्त्व अधोरेखित केले.


मुंबईतील नाट्य चळवळीचे अनेक संदर्भ शर्मिष्ठा सहा यांच्या सादरीकरणातून समोर आले. ग्रॅण्ट रोड थिएटर, माटुंगा थिएटर, पारसी थिएटर, इप्टा चळवळ यातून मुंबईतील नाटकाविषयीच्या घडामोडींचा आलेख उभा राहिला. संबंध दिवसातील सत्रांमध्ये तीव्रतेने जाणवले की, मराठी नाटकांचे योगदान ओलांडून मुंबईचा इतिहास लिहिता येणार नाही. लोकनाट्य, शाहिरी जलसे, दशावतार, गोंधळ, लावणी, संगीत नाटक यांनी एक काळ गजबजलेला होता. जलशानी शोषित वंचितांना आवाज दिला. वर्ग आणि जातीभेदांचे प्रश्न ठामपणाने मांडले.


कोल्हाटी स्त्रिया, लावणी सादरकर्त्या स्त्रिया यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी स्वच्छ नव्हती. एकीकडे अभिजात वर्गाचे संगीत नाटक आणि दुसरीकडे वंचित- कष्टकरी वर्गातील कलावंतांचे शाहिरी जलसे समांतरपणे मुंबईत सुरू राहिले.


नीरा अडारकार यांच्या विवेचनात शिवडी, दादर, परेल, बीडीडी चाळी, गिरणगाव या भागात नाटक कसे रुजले, वाढले याविषयीचे धागे उलगडत गेले. परळ रंगभूमीचे अग्रणी असलेल्या दत्ता ईसवलकरांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बुलंद आवाजाचे शाहीर निवृत्ती पवार यांनी आईच्या ओव्या ऐकत गाणे शिकले. त्यांची पहिली रेकॉर्ड आली तेव्हा, आई जे गाणे गायची ते त्यांनी प्रथम ध्वनिमुद्रित केले.


मुंबईतील गिरणगाव हे सामाजिक, सांस्कृतिक घडामोडीचे केंद्र होते. या भागातील राजकीय जाणिवा अत्यंत तीव्र होत्या. कोकणातून आलेले अनेक लोक गिरण्यांमध्ये काम करत होते. तमाशा हे त्यांचे मुख्य मनोरंजन होते.कॉम्रेड डांगे, शाहीर अमरशेख, शाहीर गवाणकर इत्यादींनी राजकीय आणि सामाजिक लढा धगधगता ठेवला. अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडे राहिली, ‘माझ्या जिवाची होतेया काहिली’ हे गीत ज्याच्या त्याच्या ओठांवर खेळत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला शाहिरांच्या गीतांनी बळ दिले.


दशावतार, नमन, खेळे, बाल्या नृत्य, वाघ्या मुरळी नृत्य असे सर्व कलाप्रकार गिरणभागातील कामगारांच्या मनोरंजनाची साधने होती. मामा वरेरकर यांच्या नाटकांमधून प्रथमच गिरणी कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष उभा राहिला. विविध कलापथके तयार झाली. सांस्कृतिक विद्रोहाचे पडसाद नाट्याच्या माध्यमातून उमटले. कष्टकरी कामगार वर्गात जशा स्त्रिया होत्या तसेच पुरुष देखील होते. लाखभर मजुरांमध्ये वीस हजार गिरणी कामगार स्त्रिया होत्या. मुंबईतील कोणतेही क्षेत्र पाहा, त्यातले स्त्रियांचे योगदान लक्षणीय आहे, नाट्य क्षेत्रही त्याला अपवाद नाही. पुढे जाऊन या विषयात समजून घेण्याजोगे खूप आहे, तूर्त या विषयाची सुरुवात परिषदेच्या माध्यमातून करून देणाऱ्या
प्रा. हेमांगी भागवत यांच्या कल्पकतेला दाद देते.

Comments
Add Comment

ज्ञानदेवे रचिला पाया...

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर ऋद्धिपूर या स्थळाचे मराठीच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र

नवसंजीवन...

माेरपीस : पूजा काळे यशाकडे जाणारा मार्ग खडतर असला, तरी अथक परिश्रमाला पर्याय नसतो. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल

सामाजिक भान जपणारी डेंटिस्ट

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे महिलांनी किती प्रगती साधली आहे, यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.” डॉ. बाबासाहेब

सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे गंभीर संकट!

पर्यावरण : मिलिंद बेंडाळे जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतात आहेत. मेघालयातील बर्निहाट हे

ऐसी मती जयाची थोर!

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर १९९० नंतर जगात जागतिकीकरण खासगीकरण-उदारीकरण हे शब्द आपल्या सतत कानांवर आदळत आले.

घातकी संगत

माेरपीस : पूजा काळे गुणदोषाच्या आधारे माणसाच्या स्वभावाचे विश्लेषण करता येते. अमूक एकाबद्दल बोलताना, त्या