मानसी खांबे
मैत्रीत प्रेम नसले तरी चालेल, पण प्रेमात मैत्री जरूर असावी. अर्थात एखादे नाते मैत्रीने अधिक खुलते. फेब्रुवारी महिन्याची चाहूल लागली की, प्रेमी युगुलांच्या मनात प्रेमाची फुलं फुलू लागतात. हा प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेमाचा आनंद घेण्याचा महिना म्हणून ओळखला जातो. ७ फेब्रुवारीला ‘रोझ डे’पासून सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू असतो. हल्ली सोशल मीडियामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ची क्रेझ अधिक वाढली आहे. पूर्वी अधिकतर मुलांकडून प्रेम व्यक्त केले जायचे. मात्र आता मुलीही मनमोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करतात. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल, तर त्या ‘फीलिंग्ज’ व्हॅलेंटाईन डे दिवशी मांडण्याचा आनंद काही औरच असतो. यादिवशी प्रेमवीर आवडत्या व्यक्तीसाठी कविता लिहिणे, प्रेम पत्र किंवा चिठ्ठी लिहिणे, गुलाब देणे, ग्रीटिंग किंवा इतर खास भेटवस्तू देऊन प्रेम व्यक्त करतात, तर काही जोडपी फिरायला जातात. सध्या बदलत्या काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याची पद्धत तसेच प्रेमाची परिभाषाही बदलत चालली आहे.
८०, ९०च्या दशकात लपुनछपून प्रेम केले जात असे. दोन ‘दिलांची धडकन’ फार-फार तर ठराविक लोकांना ठाऊक असते. आपल्या प्रियाजनाच्या नावे चिडविले तरी हृदयाची घंटी वाजायची. एखादी निर्जन भिंत दिसली की त्यावर ‘दिल’ कोरलेच समजा. प्रेमाचे प्रतीक ‘गुलाब’ गुपचूप भेट दिले जायचे. ग्रीटिंग कार्डची देवाण-घेवाण होत असे. काहीजण चित्रपट, नाटक किंवा दशावतराचे कार्यक्रम पाहायला जायचे, तर काही प्रेमीयुगुल समुद्रकिनारी किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करायचे. प्रेम व्यक्त करायला चक्क वर्ष-वर्षभर वाट पाहिली जायची. त्यामुळे तितकीच ही नाती घट्ट असायची.
सध्याच्या ‘जेन झेड’ जमान्यात पत्र किंवा चिठ्ठीद्वारे प्रियकर-प्रेयसीसमोर प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा ट्रेण्ड मागे सरला आहे. काळानुरूप प्रेमही ‘टेक्नोसेव्ही’ झाले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकेकाळी ग्रीटिंगच्या दुकानाबाहेर लागलेल्या रांगा आता ओस पडल्या आहेत. एका मिनिटात मोबाइलद्वारे एकमेकांना प्रेमाचे संदेश पाठवून प्रेम व्यक्त केले जाते. चहा किंवा कॉफी डेटवर जाणारी पावले आता आणखी एक पाऊल पुढे जात आहेत. आता मोठ्या प्रमाणात जोडपी ही डेट ‘पब’कडे वळू लागली आहेत. अनेक जण आपल्या जोडीदाराला मोबाइलमधील ॲपद्वारे व्हीडिओ किंवा ‘फोटो बूक’ तयार करून पाठवतात. काही जण एकमेकांना महागड्या भेटवस्तू देतात. रात्री १२ च्या ठोक्याला व्हॉट्सॲप, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना भरभरून व्यक्त केल्या जातात.
मधल्या काळात प्रेमाचे नाते इतरांना सांगायचे झाल्यास ‘वी आर इन रिलेशनशिप’ म्हणून सांगितले जात असे. मात्र कालांतराने त्यात बदल होत हेच रिलेशन ‘लिव्ह इन’ मध्ये बदलले. आता त्यातही परिवर्तन होत ‘सिच्युएशनशिप’ हा नात्यातील ॲडव्हान्स ट्रेण्ड सुरू आहे. ‘सिच्युएशनशिप’ हा ट्रेंड सोयीचा वाटत असल्याने तो तरुणाईच्या पसंतीला उतरत आहे. मध्यमवर्गीयांनी अद्याप याचा स्वीकार केलेला नसला तरी उच्चभ्रू तरुणाई मात्र त्याकडे वळत आहे. ‘सिच्युएशनशिप’ म्हणजे कुठल्याही नात्यात नसताना देखील नात्यात असणे आहे. यामध्ये दोघे तरुण-तरुणी एकमेकांना डेट करत असतात. मात्र ते त्यांच्या नात्याला नाव देऊ शकत नाहीत. यालाच ‘सिच्युएशनशिप’ म्हटले जाते. या नात्याला मैत्रीपेक्षा जास्त आणि रिलेशनशिपपेक्षा कमी मानले जाते. थोडक्यात कोणत्याही नात्याच्या चौकटीत न राहता, न अडकता केवळ फिजीकली, मानसिकदृष्ट्या किंवा फायनानशियल गरजा पूर्ण करण्यासाठी तरुण आणि तरुणी एकत्र येतात. यामध्ये एकमेकांबद्दलची कुठलीही जबाबदारी नसते. त्यामुळे हे नाते कधीही तोडायचे झाल्यास कुठल्याही प्रश्न-उत्तरांशिवाय, वाद-विवादांशिवाय दोघेही वेगळे होऊ शकतात.
दिल, दोस्तीचे हे नाते आता वेगळ्या वळणावर आहे. ‘सिच्युएशनशिप’ ही ‘दुनियादारी’ नसली तरी या ‘प्रेम’ नावाच्या नात्याला ती विचित्र वाटेवर घेऊन जात आहे.