पूर्णिमा शिंदे
आज समाजामध्ये ‘नेतृत्वगुण’ अत्यंत मोलाचा आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रथम गुण ‘प्रभावीपणा’चे उत्तम साधन ‘नेतृत्व विकास’ समाजातील चार अशी चार तशी, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आल्याच. समाजमनाचे अंग म्हणजे जनता, समाज, रयत, प्रजा आणि यांच्याशी वागवून घेणं त्यांना सामावून घेणं! ही असतात आणि त्याच्या अंगी असणारी महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये! नेता कसा असावा? कारण तो समाजाचा आरसा आहे. समाजसेवी प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं. तो समाज विकासक असावा. समाज प्रवाहात समाजाचा हीत साधणारा. प्रसंगी समाजसेवेसाठी झोकून, आपल्या जीवाची परवा न करणारा असावा. आव्हाने पेलणारा. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात; तुका म्हणे तोचि संत सोशी जगाचे आघात ते संत होते. त्यांनी ते सहन केले म्हणूनच ते महान होते. ते संत होते म्हणून ते महान नव्हते. ते महान झाले म्हणून संत झाले.माणूस संत होऊ शकतो! पण त्यासाठी सहिष्णुता असायला हवी.
जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
आधी केले मगचि सांगितले.
या सगळ्या गोष्टींवरून एकच निदर्शनास येते की, ‘समाजसेवा’ करत असताना यश अपयश, जय पराजय, हारजीत, सुखदुःख फुले काटे आलीच! पण त्यांना सामोरे जाऊन आव्हाने पेलतो तो नेता. संत महात्मे यांचा नेत्यांशी संबंध आहे! कसा? तर समाजातील सर्व स्तरातील लोकांशी नेत्यांचा संबंध येतो. अंतरी कळवळा, तळमळ, संवेदनशीलता, सामंजस्य या सर्व गोष्टी यातच आल्या. समाज म्हटला की, समाजातील प्रश्न, समस्या आणि अडचणी या आल्याच. संतांसारखा राहून सहिष्णू सरल, तरल मृदू “सोशिक” इत्यादी गुणांनी परिपूर्ण राहून नेत्याने संतांसारखे “महान” बनावे. ज्या समाजात आपण राहतो तिथे त्याचे मन उत्साही, आनंदी, प्रसन्न कामसू, “निर्मळ” असावे. प्रभुत्व, व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रखर बुद्धी तेजाने बुद्धिमान तेज ओतप्रोत असे असावे. उत्तम वाचक असावा. शरीर सुदृढ, बलवान कष्टकरी असावे. आळशी नसावे. मैत्री, मुदिता, करुणा, मानवता आणि स्नेहप्रधान असा चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असावे. सूर्यासम तेजस्वी, ओजस्वी सर्वात महत्त्वाचे सूर्यासारखा “तेजस्वी” वक्तशीरपणा सूर्य जसा प्रकाश देतो दैदीप्यमान होऊन तसाच. अगदी “नम्र” नम्रतेने झुकणारा विनयशील. विनम्र झुकणे म्हणजे वाकणे नाही, तर ताठरता कमी आणि लवचिकता जास्त अहंकार, गर्व, अभिमानी वृत्ती नसावी. तरच अर्धे भांडे रिकामे असेल, तर आवाज करते. तेच भरलेले असेल पूर्ण तर पूर्णत्व येते. असे “शालिन” चारित्र्यवान निर्मळ अन्यायाची प्रचंड चिड “न्यायी” “सत्यवादी” असावा वाणी मधाळ बोल प्रभावी, परिणामकारक लक्षवेधी, मिठास, सुमधुर असावी. “क्षमाशील” माफ करणारा असावा. सूडबुद्धीचे राजकारण कधीच नको. इतरांच्या मनाला, शरीराला इजा पोहोचवण्याचे मनात सुद्धा येऊ नये.
परोपकारी असावा, वैचारिक प्रगल्भता असावी. सेवाभावी वृत्ती असावी. संघर्ष योद्धा असावा. लुटमार करून लढाई भ्रष्टाचार त्याच्या अंगी असू नये. वाघासारख्या निधड्या छातीचा, संघर्ष योद्धा, वेेळप्रसंगी स्वतः लढा देणारा असावा. भ्रष्टाचाराविरोधी महागाई अत्याचार विरोधी असत्य हिंसा या विरुद्ध लढणारा असावा. समताधिष्ठित न्यायप्रिय मानवतावादी सत्य, शिवम, सुंदरम, धर्मरक्षक, सर्व समावेशक, समाजप्रिय इत्यादी गुणांनी परिपूर्ण असेल. ती व्यक्ती नेता होऊ शकते. आपणही स्वतः माणूस आहोत माणसाने माणसाशी माणसासम वागवे, ही माणुसकी त्याच्यात असावी. प्रयत्नशील सतत राहावे. आशादायी असावे. सुसंवादक असावा प्रतिभाव नसावा. शिस्तीचा आदर करणारा, स्त्रियांचा आदर आणि गौरव करणारा असावा. हेच नेत्याच्या अंगी असलेले शौर्य. पराक्रमी, सामर्थ्य, कर्तृत्ववान, आदर्श असावेत. सामाजिक विकास करणारा, शाळा, रुग्णालय, शेती, पाणी, वीज, उद्योग, रस्ते याविषयी “क्रांती” करणारा असावा. अभ्यासू, सुशिक्षित, सर्जनशील, नाविन्यपूर्ण उपक्रम नवे बदल स्वीकारणारा असावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समोरच्याचं शांतपणे ऐकून घेऊन त्याला योग्य तो न्याय देणारा असावा. “सभाधारिष्ट्य” सभेत बोलताना सर्वांच्या हृदयाला हात घालून आपला प्रभावी मत मांडता आले पाहिजे. इतका आपलासा तो नेता वाटला पाहिजे. प्रत्येकाला जवळचा वाटला पाहिजे. सुख-दुःखात साथ दिली पाहिजे. तत्परतेने कार्य केले पाहिजे.