प्रा. देवबा पाटील
आनंदराव व त्यांचा नातू स्वरूप हे रोजच्यासारखे सकाळी फिरायला निघाले आणि स्वरूपचे प्रश्न सुरू झाले. “आजोबा, अंगावर काटे कसे येतात?” स्वरूपने पुन्हा प्रश्न केला. आनंदराव म्हणाले, “आता मी तुला थंडीच्या दिवसांत अंगावर काटे कसे येतात ते सांगतो. जेव्हा आपणास एकदम थंडी वाजते तेव्हा आपल्या त्वचेचे तापमान खूप कमी होते. त्यामुळे आपल्या शरीराचे सारे स्नायू एकदम आकुंचित होतात. शरीराचे संरक्षण करण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर केस असतात. शरीरावर प्रत्येक केसाखाली सूक्ष्म स्नायू असतोच. केसाच्या मुळाशी असलेल्या स्नायूच्या एकदम आकुंचन पावण्यामुळे त्वचेवरील केस ताठ उभा राहतो. त्यालाच आपण अंगावर काटा येणे असे म्हणतो.” आजोबा पुढे म्हणाले, “परंतु थंडीच्या दिवसांत कठीण रबराच्या कंगव्याने कोरडे केस विंचरले असता तड् तड् असा आवाज ऐकू येतो व तो कंगवा हाताजवळ आणल्यास हातावरचे केस ताठ उभे राहतात. त्याचे कारण मात्र वेगळे असते. त्याचे कारण असे असते की, तेथे घर्षणामुळे विद्युतप्रभार निर्माण होतो. त्या विद्युतप्रभाराने ते केस ताठ उभे राहतात.”
चला आता परतीच्या प्रवासात मी तुला त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच दाखवतो. असे म्हणत आजोबांनी आपल्या खिशातून रबराचा एक छानसा कंगवा काढला व घराकडे परतण्यासाठी आपली पाठ फिरवली. त्यांच्यासोबत स्वरूपसुद्धा मागे वळला. आजोबांनी कंगव्याने स्वरूपच्या डोक्याचे केस विंचरले व त्यांचा होणारा सूक्ष्मसा तड्तड् असा आवाज स्वरूपला ऐकवला. तसेच त्याच्या हाताजवळ कंगवा नेऊन त्याच्या हातावरचे केस कसे ताठ उभे राहतात हेसुद्धा त्याला दाखविले. ते बघून तर स्वरूप एकदम खूश झाला व त्याने पुढचा प्रश्न विचारला. “काही जणांना थंडी कमी वाजते तर काही जणांना जास्त वाजते. असे का होते आजोबा?” स्वरूपने प्रश्न केला. आजोबा म्हणाले, “त्वचेला होणारी हवेच्या तापमानाची जाणीव ही शरीरातील चरबी म्हणजे मेदाच्या प्रमाणावरही अवलंबून असते. त्वचेखाली असलेली चरबी ही उष्णतारोधक असते. ती शरीरातील उष्णतेला बाहेर जाण्यास प्रतिबंध करते. म्हणून ज्यांच्या शरीरात चरबी जास्त असते अशा लठ्ठ व्यक्तींना थंडी कमी वाजते; परंतु अशा व्यक्तींना उन्हाळ्यात त्यांच्या शरीराची उष्णता कमी होण्यासाठी जास्त घाम येतो आणि ज्यांच्या शरीरात मेद कमी असतो वा स्निग्ध पदार्थ कमी असतात अशा सडपातळ व्यक्तींना थंडी जास्त वाजते. म्हणूनच काही जणांना थंडी कमी वाजते, तर काही जणांना जास्त वाजते.”
“आजोबा, हिवाळ्याच्या दिवसातच आपले हातपाय का उलतात व ओठ का फाटतात?” स्वरूपने विचारले. “आपल्या त्वचेचे अंतर्त्वचा व बाह्यत्वचा असे दोन भाग असतात. अंतर्त्वचेच्या भागात तेलकट द्रव स्त्रवणाऱ्या स्नेहपिंड नावाच्या ग्रंथी असतात. त्यातून स्त्रवलेला द्रव केसांच्या मुळांवरून वाहत येऊन त्वचेवर पसरतो. त्याचप्रमाणे अंतर्त्वचेत असलेल्या घामाच्या ग्रंथीतून घाम त्वचेवर येतो व आजूबाजूला पसरतो. म्हणजे एक प्रकारचा तेलकट पदार्थ व घाम यांच्या मिश्रणाचा एक पातळसा थर आपल्या त्वचेवर पसरलेला असतो. त्यामुळे आपली त्वचा मऊ राहते. हिवाळ्यात हवा कोरडी व थंड असते. कोरड्या हवेमुळे त्वचेवरील तेलकट पदार्थ व घाम यांचे फार लवकर बाष्पीभवन होते. आपली त्वचा कोरड्या हवेच्या संपर्कात येते व पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे तिच्यातील ओलावा कमी होतो. त्यामुळे आपली त्वचा सुकते व तडकते. म्हणून हिवाळ्याच्या दिवसात आपले हातपाय उलतात व ओठ फाटतात.” आजोबांनी सविस्तर सांगितले नि घराकडे परत फिरले.