‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती
माणगाव : राज्य आणि केंद्र सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आहे. यापुढील प्रवासही मंदिरे व हिंदु समाज यांना भिती न बाळगता कार्य करता येईल. आपल्या भारतीय संस्कृतीचा मंदिर हा इतिहास आहे. जेव्हा इस्लामिक आक्रमक आले तेव्हा त्यांनी व्यक्ती किंवा संस्थानवर नाही तर मंदिरांवर हल्ले केले. भारताला मजबूत बनविणारी मंदिरे असल्याने इस्लामिक आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून मंदिरे उद्धवस्त केली; मात्र यापुढे हिंदु राष्ट्र निर्मितीत मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतील. हिंदूंच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, तसेच मंदिराच्या विरोधात विचार करण्याचीही हिंमत होणार नाही असे संघटन निर्माण करू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले. ते सिंधुदुर्गातील माणगाव (कुडाळ) येथील श्रीदत्त मंदिराच्या सभागृहात श्रीदत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती द्वारा आयोजित द्वितीय जिल्हास्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’त बोलत होते.
प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांनी या मंदिर परिषदेच्या निमित्ताने पाठविलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना काही मागण्याचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांसंदर्भात शासन स्तरावरून पाठपुरावा करून योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील यांनी केले. सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती होती. दत्त मंदिर येथील पार्किंग सुविधा बाबत आपण प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून कृषी विभागाची असलेली जागा कार्यक्रमासाठी पार्किंग म्हणून वापरावी अशी भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी विश्वस्त मंडळाने दिलेल्या निवेदनानंतर घेतली.
या अधिवेशनाचे उद्घाटन श्रीदत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दीपक साधले, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक संत सदगुरु सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट व मंदिर महासंघाचे कोअर टीमचे सदस्य अनुप जयस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी पालकमंत्री नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रणजीत देसाई, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सदगुरु स्वाती खाडये, माणगाव गावच्या सरपंच मनिषा भोसले आणि श्रीदत्त संस्थान अक्कलकोट स्वामी भक्त परिवाराचे अध्यक्ष डॉ.वि.म.काळे यांचीही उपस्थिती होती.
सर्व मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त होईपर्यंत लढा चालू ठेवणार- सुनील घनवट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या जागा काही जणांच्या माध्यमातून बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकडे जिल्हा प्रशासन व पालकमंत्री नितेश राणे यांनी लक्ष घालून देवस्थानच्या जागा देवस्थानलाच मिळाव्यात यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी या वेळी केले.
मंदिरे ही उपासनेची केंद्र व्हावी – सदगुरू सत्यवान कदम
मंदिरे हे आपल्या हिंदूंची आधारशीला आहेत. मंदिरेही धर्मशिक्षणाची केंद्र बनले पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आज धर्मशिक्षण नसल्यामुळे आपल्या मुली लव्ह जिहादला बळी पडत आहे. धर्मांतरण होत आहे. मंदिरातून लहानांसाठी बालसंस्कारवर्ग, किशोरांसाठी सुसंस्कारवर्ग, युवांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि मोठ्यांसाठी सत्संग चालू करणे आवश्यक आहे. मंदिरे ही उपासनेची केंद्र बनली पाहिजेत.असे मत सत्यवान कदम यांनी व्यक्त केले.
झाराप येथील हॉटेलला सिल
झाराप येथील हॉटेल मध्ये किरकोळ कारणावरून पर्यटक यांना झालेली मारहाण जिल्ह्याच्या पर्यटनाला बदनाम करणारी व जिल्ह्याच्या नुकसानीची असून संबंधित हॉटेलला अन्न आणि औषध प्रशासन यांना सिल करण्याची सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.