युवराज अवसरमल
मीरा जगन्नाथने अल्पावधीतच अभिनयाच्या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. मराठी बिग बॉस ३ सीझनपासून जास्तच प्रकाशझोतात आलेल्या मीराचे ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट व ‘संगी’ हा हिंदी चित्रपट नुकतेच रिलीज झालेले आहेत.
मीराचं शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. स्पोर्ट्समध्ये देखील तिचा सहभाग असायचा. शाळेत असल्यापासून ती योगा करीत आलेली आहे. नंतर तिने शाळेत योगा टीचर म्हणून काम केले. बाहेर प्रायव्हेट ठिकाणी देखील तिने योगा टीचर म्हणून काम केले. तिथे तिच्या एका क्लाएंटने तिचे काही फोटो काढले व ॲडव्हर्टायझिंग एजन्सीकडे पाठविले. तिला एका ज्वेलर्सची जाहिरात मिळाली. त्यानंतर तिला भरपूर जाहिराती मिळाल्या. टीव्हीवरील फेअर अॅण्ड लव्हली जाहिरात पाहिल्यावर तिने ठरवले की या क्षेत्रातच काम करायचे.
त्यानंतर तिने मुंबई गाठली. अभिनयाच्या क्षेत्रात आपला निभाव लागेल की नाही अशी शंका तिला आली व परत तिने पुणे गाठले. आठवड्यातून ३-४ वेळा मुंबईला येऊन ती ऑडिशन देत राहिली. शेवटी तिच्या प्रयत्नाला यश मिळाले. तिला ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका मिळाली. ही मालिका खूप गाजली. तिचे देखील कौतुक झाले. ती मुंबईला शिफ्ट झाली. तिला ‘अमेरिकी पंडित’ हा हिंदी चित्रपट मिळाला. त्यामध्ये अभिनेता आर.माधवनसोबत काम करण्याची संधी मिळाली. तीन दिवसांचे काम झाले व लॉकडाऊन सुरू झाला. तो चित्रपट बंद पडला. लॉक डाऊनमध्ये ती मुंबईत अडकून पडली. त्या दरम्यान तिने ऑनलाईन योगाचे क्लासेस घेतले.
त्यानंतर तिला प्लॅनेट एमसाठी ‘तुझी माझी यारी’ ही वेबसिरीज मिळाली, त्यानंतर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका मिळाली. ही मालिका सुरू असतानाच तिला मराठी ‘बिग बॉस ३’ची ऑफर आली. तो एक वेगळाच अनुभव तिला मिळाला. बिग बॉसमध्ये ती शेवटपर्यंत होती. तिच्यातला संयम वाढला. त्यानंतर तिची अभिनयाची घौडदौड सुरूच झाली.
बिग बॉस ४ च्या वाइल्ड कार्डमुळे ती परत एकदा बिग बॉसमध्ये गेली. नंतर तिने ग्रॅमी इव्हेंट ही कंपनी स्थापन केली. स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. लवकरच ती गाण्याचा अल्बम करणार आहे. डिस्कवरी चॅनेलसाठी राणी योंका जंगल हा रिॲलिटी शो केला.
‘संगी’ हा तिचा नवीन हिंदी चित्रपट आलेला आहे. संगी म्हणजे मित्र. या चित्रपटामध्ये तीन मित्रांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तिघांच्या आयुष्यातले बालपणीचे गंमतीशीर, आनंददायी क्षण हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्यात आले आहेत.मैत्री, पैसे व त्यातील रंजक वळण चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. त्या तिघा मित्रांपैकी एका मित्राच्या पत्नीची भूमिका तिने साकारली आहे. तो मित्र इतर मित्रांवर पैसे उडवीत असतो. हे तिला मान्य नसते. नवऱ्याला वाईट वळणावर जाण्यापासून ती थांबवते. मीराला तिच्या इलू इलू व संगी चित्रपटाच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!