Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सDrama Practice Hall : ‘तालीम हॉल’ आणि प्रायोगिक रंगकर्मींचा ‘आविष्कार’...

Drama Practice Hall : ‘तालीम हॉल’ आणि प्रायोगिक रंगकर्मींचा ‘आविष्कार’…

राज चिंचणकर

नाटकाच्या रंगमंचीय आविष्कारासाठी तालमी महत्त्वाच्या असतात आणि त्यासाठी समस्त रंगकर्मींची तालमीच्या जागेच्या उपलब्धतेसाठी धावपळ सुरू असते. व्यावसायिक नाटकांची गणिते वेगळी असल्याने, त्यांना याबाबतीत फार अडचण येत नाही. मात्र प्रायोगिक रंगकर्मींना ‘तालीम हॉल’ मिळवण्यासाठी कसरत करावी लागते. या संदर्भात एक महत्त्वाची घटना प्रायोगिक रंगकर्मींच्या माध्यमातून मुंबईत घडली होती. माहीमचे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल निर्माण झाल्यानंतरच्या काळात, या नाट्यसंकुलात असलेला हॉल प्रायोगिक व बालरंगभूमीसाठी मिळावा याकरिता ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेच्या ज्येष्ठ रंगकर्मींसह, इतर अनेक रंगकर्मींनी तशी मागणी लावून धरली होती. प्रायोगिक नाट्यचळवळीला सर्वार्थाने वाहून घेतलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे, सुलभा देशपांडे आदींचे त्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. या दरम्यान, एकदा १४ जूनच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिवशी सुलभा देशपांडे, दामू केंकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी हा ‘तालीम हॉल’ प्रायोगिक रंगभूमीसाठी मिळावा, या मागणीसाठी भर पावसात नाट्यसंकुलाच्या प्रांगणात धरणे धरले होते. सुलभा देशपांडे यांचे सन २०१६ मध्ये निधन झाले; तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘आविष्कार’ नाट्यसंस्था आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांनी आयोजित केलेल्या स्मृतीसभेतही ‘तालीम हॉल’चा विषय चर्चिला गेला होता. अरुण काकडे, रोहिणी हट्टंगडी, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी या आणि अशा अनेक ज्येष्ठ रंगकर्मींच्या साक्षीने ‘तालीम हॉल’ची मागणी पुन्हा एकदा पटावर आली होती. आता सद्यकाळात, यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलाचे नूतनीकरण झाल्यावर सदर हॉलचे नामकरण ‘साळगावकर प्रायोगिक रंगमंच’ असे करण्यात आले आहे आणि ज्या ‘तालीम हॉल’साठी ‘आविष्कार’च्या ज्येष्ठ रंगकर्मींनी पाठपुरावा केला; त्याच हॉलमध्ये आता ‘आविष्कार’चा यंदाचा वर्धापनदिन सोहळा व नाट्यमहोत्सव होत आहे.

ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, अरुण काकडे यांनी ९ फेब्रुवारी १९७१ रोजी ‘आविष्कार’ संस्थेची स्थापना केली. ‘आविष्कार’ने आतापर्यंत २१० नाट्यकृतींची निर्मिती आणि त्यांचे ५००० हून अधिक प्रयोग केले आहेत. पण केवळ इतके करूनच ‘आविष्कार’ थांबली नाही; तर सर्व वयोगटातल्या कलाकारांसाठी नाट्यप्रशिक्षण शिबिरे, नाट्यवाचन, कथा, काव्यवाचन, शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्यनाट्य शिबिरे आदी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठीही ‘आविष्कार’ कार्यरत राहिली. मुंबईच्या दादर विभागात असलेल्या छबिलदास शाळेत मुहूर्तमेढ रोवलेल्या ‘आविष्कार’ची वाटचाल, ही ‘छबिलदास चळवळ’ म्हणूनच आजही ओळखली जाते. ‘आविष्कार’ची ही नाट्यचळवळ जोरात असताना छबिलदास शाळा म्हणजे त्यांच्यासाठी मोठा आधार होता. कालांतराने ‘आविष्कार’चे बस्तान माहीमच्या एका शाळेत हलवले गेले. पण तरीही सुलभा देशपांडे यांच्या मनात ‘तालीम हॉल’ कायम घर करून राहिला होता. आता इतक्या वर्षांनंतर याच ‘तालीम हॉल’मध्ये, ‘आविष्कार’चा महोत्सव पार पडत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.

‘आविष्कार’च्या संस्थापकांपैकी एक असलेले ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद देशपांडे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी व ‘आविष्कार’ संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या उद्देशाने गेली ३७ वर्षे ‘अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात येत असतो. यंदा ‘आविष्कार’चा ५४ वा वर्धापन दिन आणि ‘३८ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव’ यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलातल्या ‘साळगावकर प्रायोगिक रंगमंच’ येथे ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. विशेष म्हणजे, मराठी भाषेला अलीकडेच दिल्या गेलेल्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या पार्श्वभूमीवर, ‘अभिजात मराठी’ हे सूत्र यंदाच्या महोत्सवासाठी निश्चित करण्यात आले आहे.

मराठी भाषा आणि इतर ज्ञानशाखा या अानुषंगाने मान्यवरांची व्याख्याने आणि नाट्यप्रयोग असा या महोत्सवाचा कार्यक्रम आहे. प्रा. डॉ. दीपक पवार यांचे ‘मराठी भाषेचे राजकारण’, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे ‘मराठी कथा, कादंबरी, कवितेची भाषा आणि नाटकाची भाषा यांचा तौलनिक अभ्यास’, प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे ‘दलित साहित्य – भाषिक योगदान’, डॉ. मुकुंद कुळे यांचे ‘मौखिक साहित्य आणि मराठी भाषा’, तसेच संजीव चांदोरकर यांचे ‘भाषा आणि अर्थकारण’ याविषयीची व्याख्याने हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. या व्याख्यानांसोबतच काही नाट्यप्रयोगांचे आयोजनही करण्यात आले आहे. ‘थिएटर ॲनाटोमी’, पुणे निर्मित ‘माईथ ऑफ मेंडीगोज’; ‘आसक्त’, पुणे निर्मित ‘व्हाया सावरगाव खुर्द’; ‘परिवर्तन’, जळगाव निर्मित ‘नली’; ‘रंगभूमी डॉट कॉम’ व ‘इनकम्प्लिट थिएटर’, पुणे निर्मित ‘वणवा’ आणि ‘आविष्कार’ निर्मित ‘गोळकोंडा डायमंडस’ या नाट्यकृती या महोत्सवाच्या आकर्षणाचा भाग आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -